नागपूर : राजधानी मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत पोहोचले असून काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांन घेतलीय. तर, मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, त्यास आमच्या शुभेच्छा. पण, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा मात्र ओबीसीतून आरक्षण नको. मराठा (Maratha) समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी नागपूरच्या (Nagpur) भोसले घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करत मराठा आरक्षणासाठी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचं काम झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असेही मुधोजी राजे भोसले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता, न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानासह सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि परिसरात आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन ते पुढील काही दिवस मुंबईतच मुक्काम करण्याच्या उद्देशाने तयारीनीशी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.