मुंबई : राज्यातील तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Reservation) देऊ केलं आहे. मात्र, आम्हाला दिलेलं 10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं, त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, अशी मागणी करत आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी मुंबईत आंदोलनाचाी धडक दिली आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मनोज जरांगेच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत. सोबत कोकण विभागीय आयुक्त चर्चेसाठी उपस्थित असणार आहेत. जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या निवेदनानुसार मराठा आरक्षण संदर्भातील उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर, आझाद मैदानातील (Mumbai) आंदोलनास भेट देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार काय तोडगा निघणार? उपसमितीच्या बैठकीत काय तोडगा निघणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले होते, आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते सोमवारपासून जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी गावात आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
आम्हाला हक्काचं कायमस्वरुपी आरक्षण हवंय
कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यासच सुरू असल्याचा टोलाही जरांगे यांनी लगावला. ते म्हणाले की आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. आमची ही आमची जमीन आहे हे आम्हाला भक्कम माहीत असल्याचं ते म्हणाले. कायद्यात बसणारे आरक्षण आम्हाला हवं आहे. न बसणाऱ्या 29 जाती फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणात घालून त्यांनी खुन्नस दाखवली आहे. आजचा दिवस प्रेमानं सांगण्याचा असून आरक्षण दिल्यास मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नाही दिले ते मी सरकार सुद्धा उलथवून टाकू शकतो, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीत आल्यावर मी कोणा मंत्र्याचे ऐकणार नाही. चार महिन्यांपूर्वीच आंदोलनासाठी तारीख दिली असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी आपण स्वतः फडणवीस यांना फोन केला होता आणि आंतरवाली सराटी देण्याचा आवाहन केलं होतं, असेही जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी नेत्यांचं प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन
जोपर्यंत जरांगे पाटलांचे आंदोलन संपत नाही, तोपर्यंत ओबीसी आंदोलनही अंतरवाली सराटीत सुरू राहणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी नेते आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाज हा देशातील एकमेव समाज आहे की, त्यांना चार-चार आरक्षण मिळत असतानाही ते पुन्हा आरक्षणसाठी भांडत असल्याचे ओबीसी नेत्यांनी म्हटले.