नागपूर : मॅट्रिमोनियल साईट्स वरून तरुणींशी ओळख वाढवून नंतर त्यांच्याशी आलिशान हॉटेल्समध्ये भेटणाऱ्या आणि विश्वास संपादन करून त्यांचे दागिने घेऊन पसार होणाऱ्या एका भामट्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मिक्की सिंह सहानी असे या भामट्याचे नाव असून त्याच्यासह त्याचा सहकारी आनंद शाहू यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


या दोघांकडून लुटीचा 7 लाख 13 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे भामटे नावाजलेल्या मॅट्रिमोनियल साईट (विवाह संकेतस्थळ) वर स्वतःची वेगवेगळ्या नावाने खोट्या आयडी निर्माण करून श्रीमंत घरातील तरुणींना, महिलांना जाळ्यात ओढायचे. या भामट्यांनी आतापर्यंत चार तरुणींना फसविले असून सुमारे शंभर तरुणी किंवा महिला त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मॅट्रिमोनियल साईटवरील सर्व माहिती खरी मानून पुढे जाणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे.


मिक्की सिंह सहानी उर्फ रिंपी खंडुसा उर्फ रोमी अरोरा अशा अनेक नावांनी या भामट्याने मॅट्रिमोनियल साईट्स (विवाह संकेतस्थळ) वर आपलं अकाउंट बनवलं आहे. नावाजलेल्या विवाह संकेतस्थळांवर हा भामटा स्वतःला मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर असल्याचे भासवून खोटे आयडी तयार करायचा. त्यांच्या माध्यमातून श्रीमंत घरातील महिला आणि तरुणींशी ओळख वाढवायचा. विवाहेच्छुक तरुणी त्याला भेटायला तयार व्हायच्या. नागपूरसह देशातील मोठ्या शहरात आलिशान हॉटेल्समध्ये तरुणींशी भेटल्यानंतर आपल्या आकर्षक बोलण्याने मिक्की त्या तरुणींवर आपला प्रभाव निर्माण करायचा.


प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीवर जीवघेणा हल्ला


विश्वास संपादन केल्यांनतर त्यांचे दागिने आणि इतर महागड्या वस्तू घेऊन पसार व्हायचा. नागपुरात मिक्कीने अशाच पद्धतीने सोनेगाव आणि प्रतापनगर परिसरातील दोन महिलांचे लाखो रुपयांचे दागिने, रक्कम लंपास केल्या होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये ही अशाच घटना घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कुठे फसवणूक करणाऱ्याचे नाव रिंपी खंडूसा तर कुठे रोमी अरोरा असे नाव होते. दोन्ही नावाच्या आयडीवर आरोपींनी एकच पत्ता दिल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी आणखी शोध घेतल्यावर आरोपी मिक्की महिलांना भेटायला जाण्यासाठी ओला टॅक्सीचा वापर करत असल्याचे समोर आले. तिथून पोलिसांनी आरोपीचा पत्ता मिळवला आणि त्याला बेड्या ठोकल्या.


मिक्की सहानीने रोमी अरोरा, रिंपी खंडूसासह इतर अनेक नावाने बनावट आयडी तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कुठे त्याने स्वतःला एका कंपनीचा मालक असल्याचे सांगतले आहे. तर कुठे मोठ्या हुद्द्यावरच्या नोकरीवर दाखवले आहे. त्याचे बनावट आयडी खरे मानून अनेक विवाहेच्छुक तरुणी आणि महिला त्याच्या संपर्कात येत होत्या. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर तो त्यांना भेटायला वेगवेगळ्या शहरात बोलवायचा. त्यासाठी तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून मुलींना आकर्षित करायचा. रात्री त्या झोपेत असताना त्यांच्या अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास करायचा.


मुंब्र्यात सहा वर्षीय मुलीवर सावत्र बापाकडून पाशवी अत्याचार


मिक्की सहानी या भामट्याने तरुणींकडून लुटलेले दागीने आनंद शाहू नावाच्या सहकाऱ्याला विकल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. मिक्की शनीच्या मोबाईल मधून किमान शंभर इतर विवाहेच्छुक महिलांचे नंबर पोलिसांना मिळाले असून अनेकांशी तो भेटण्यासाठीच्या चॅटिंग करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या भामट्याच्या जाळ्यात अडकून त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलांनी पोलिसांकडे येऊन तक्रार देण्याची आणि इतर महिलांनी अशाच भामट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.


क्राईम पेट्रोल मालिका पाहून पत्नीनंच प्रियकरासोबत रचला पतीच्या हत्येचा कट, नागपुरातील हल्ल्याचा छडा