मुंबई : माणुसकीला काळिंबा फासणारी घटना मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे . एका सावत्र बापाने त्याच्या 6 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी नराधम बापाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच पुढील तपास मुंब्रा पोलिस करीत आहे. तसेच चिमुकलीवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Continues below advertisement


माणुसकीला आणि दातृत्वाला काळिमा फासणारे कृत्य मुंब्रा येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंब्र्यातील रशीद कंपाऊंड येथील भाड्याच्या घरात 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत रहात होता. मुलीची आई बाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडित मुलीला अमानुष मारहाण करून तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीच्या चटके देऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करत असे. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपल्यासोबत जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली व घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने चिमुरडीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता याचा पाढाच वाचला. कसा आपला नराधम सावत्र पिता माचीसचे चटके देत होता व आपल्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता याची माहिती दिली.


पीडित मुलीची कथा ऐकून परिसरातील महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित मुलीची तपासणी करून तिच्यावरील अत्याचाराची खात्री पटताच आईच्या फिर्यादीवरून कौसा पोलिसांनी सदर नराधम सावत्र पित्याला अटक केली व भा.दं.वि. कलम 376, 323, 506 (2), बाल न्याय अधिनियम कलम 75, पोस्को 4, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.