Nagpur Crime News नागपूर : प्रतिबंधित  नायलॉन मांजा (Naylon Manja) विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. अतिशय घातक आणि जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. यासोबतच प्रशासनाला यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहे.


नायलॉन मांजा विरोधात नागपूर पोलीस (Nagpur News) देखील अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. गुरुवारी (दि. 11) एकाच दिवशी पोलिसांनी 12 ठिकाणी छापेमारी केली आहे. नायलॉन मांजा विकणाऱ्या 15 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 15 जणांकडून सुमारे 3.13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


नागपूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा


मकर संक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. या प्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नायलॉन मांजा विक्रीविरोधात सक्रिय होण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.


नागपूर तहसील पोलिसांनी बंगाली पंजा परिसरात गुरुवारी कारवाई करून अहमद रजाखान अब्दुल खान यास 50 नायलॉन मांजाच्या चकऱ्यांसह अटक केली. प्रतापनगर पोलिसांनी खामला सिंधी कॉलनी परिसरातून कैलाश सफरमल गोचवानी यास 15 नायलॉन मांजाच्या चकऱ्यांसह पकडले. चितारओळीच्या गरुडखांब परिसरातून मोहम्मद आवेज ऊर्फ अस्सू मोहम्मद शकील उमरला 8 चकऱ्यांसह पकडण्यात आले. वनदेवीनगर परिसरातून कमलाकर ऊर्फ सोनू विजय हेडाऊ याला 7 नायलॉन मंजाच्या चकऱ्यांसह अटक केली.


शांतीनगर पोलिसांनी प्रेमनगर परिसरात छापा टाकून राहुल रमेश पाल याला अटक केली. त्याच्याकडून 9 चकऱ्या जप्त करण्यात आल्या. कपिलनगर पोलिसांनी बाबा दीपसिंगनगर परिसरातून शेख समीर शेख साबिर यास पकडून बंडल जप्त केले. सक्करदरा पोलिसांनी छोटा ताजबाग परिसरात धरपकड मोहीम राबविली. यशोधरानगर पोलिसांनी संजीवनी क्वॉर्टर परिसरातून जिशान अली आसिफ अली याला अटक करून 9 चकऱ्या जप्त केल्या. त्याने हा माल हर्ष रवी मतेलकर (रा. कांजी हाऊस चौक) याच्याकडून घेतल्याने त्यालाही पकडण्यात आले.  जागनाथ बुधवारी येथून महक विजय पराते, उत्कर्ष विजय पराते, अयोध्यानगरातून अभिषेकसिंह गजेंद्रसिंह सोळंकी, उमरेड रोडवरून तेजस श्रीधर चरडे याला पकडण्यात आले. त्यांच्याकडून 18 चकऱ्या जप्त करण्यात आल्या. 


गुजरात - उत्तर प्रदेशात कनेक्शन 


गुजरात व उत्तर प्रदेशात नायलॉन मांजाचे उत्पादन होत असते. त्या राज्यांतून महाराष्ट्रात मांजा येतो. त्यामुळे त्या दोन राज्यांत मांजाच्या उत्पादनावर बंदी आणायला पाहिजे, असे अ‍ॅड. रवी सन्याल यांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीत सांगितले होते. आता मकरसंक्रांतीचा सण जवळ आला आहे. यामुळे नायलॉन मांजाचा वापर वाढत आहे. त्यामुळे तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले होते. यावर हायकोर्टाने मुख्य सचिवांना या मुद्यावर लक्ष देण्याचे आदेश दिले आहे. सायबर पोलीस देखील सोशल मीडियावर नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत. 


सायबर पोलिसांनी सापळा रचून सक्करदराच्या तिरंगा चौकातून ऋषिकेश रमेश अडकिने याला अटक केली. त्याच्या वाहनाच्या झडतीत 7  बंडल मांजा आढळून आला. पोलिसांनी नायलॉन मांजा खरेदीच्या बहाण्याने दोन तरुणांना गोंडवाना चौकात बोलावून अटक केली. सर्वांवर पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :