Nagpur News नागपूर: मकर संक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित  नायलॉन मांजा (Naylon Manja)  हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता नागपूर शहरातील (Nagpur City) अनेक उड्डाणपूल आज सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी 15 जानेवारीला दिवसभरासाठी शहरातील जवळ-जवळ सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले आहे.


सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील उड्डाणपूल दिवसभरासाठी बंद


प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. दरवर्षी या पतंगबाजीच्या नादात अनेक हृदयद्रावक घटना घडत असतात. त्यातील सर्वाधिक घटनांमागे कारण हा नायलॉन मांजा ठरत आहे. या नायलॉन मांजाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. यासोबतच प्रशासनाला यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहे.


नागपूर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने शहरातील बहुतांश उड्डाणपूल आज 15 जानेवारीला दिवसभरासाठी बंद करण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजा उड्डाणपूलावर पडून तो वाहनचालकांच्या मध्ये येऊ शकतो, परिणामी त्यातून मोठा अपघात आणि  जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


आज बंद ठेवलेले उड्डाणपूल


शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुल पूल, सक्करदरा उड्डाणपूल, दिघोरी उड्डाणपूल, गोळीबार चौक-पाचपावली उड्डाणपूल, कडबी चौक पूल, कोकाकोला पूल, दहीबाजार-मेहंदीबाग पूल, मानकापूर, सदर उड्डाणपूल, मनिषनगर उड्डाणपूल.


नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा


जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पोलीस विभागाने तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर विक्री आणि वापराबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. सोबतच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील पोलीस म्हणाले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :