Weather Update Today: ढगाळ वातावरण निवर्तल्यानंतर विदर्भात (Vidarbha) थंडीचा (Winter) कडाका वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र आज, 15 जानेवारीला विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा हा 30 अंश सेल्सिअसच्या वर नोंदविण्यात आला आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, थंडी वाढण्याऐवजी उकाडा वाढल्याची जाणीव नागरिकांना होत आहे.


उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे 15 जानेवारीनंतर किमान तापमानात अंदाजे तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर आभाळ मुख्यतः निरभ्र राहणार असल्यामुळे कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागाच्या (India Meteorological Department) वतीने वर्तवला आहे.


 पुढील दोन दिवसात तापमान घटण्याचा अंदाज 


मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. मध्यप्रदेशकडून येणारे वारे थंड आहेत. त्यामुळे विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.


विदर्भावर हवामान विभागाच्या वतीने कोणतीही धोक्याची सूचना देण्यात आलेली नाही. तसेच पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्हे कोरडे राहणार असल्याचे नागपूर प्रादेशिक विभागाच्या वतीने संगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरणात कोणताही मोठा बदल होणार नाही. पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल जाणवणार नाही.


विदर्भात तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसच्या वर


विदर्भात आज सर्व जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा हा 30 अंश सेल्सिअसच्या वर नोंदविण्यात आला आहे. नागपुरात आज दिवसाच्या तापमानात आंशिक वाढ झाली आणि पारा 31.4 अंशावर पोहोचला, जो सरासरीपेक्षा 2.7 अंशाने अधिक आहे. दुसरीकडे रात्रीच्या तापमानात आंशिक घट झाली असली, तरी पारा सरासरीपेक्षा 4 अंशाने अधिक असून 16.6 अंशाची नोंद करण्यात आली. नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांतही तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशाने अधिक आहे. विदर्भात आज ब्रम्हपुरी शहरात सर्वाधिक कमाल तापमान 32.8 अंश आणि सर्वात कमी तापमान हे वाशिम येथे 11.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. 


2021 वगळता 10 वर्षांत जानेवारीतील तापमान 10 अंशांच्या खाली


गेल्या 10 वर्षांत 2021 वगळता जानेवारी महिन्यातील तापमान सातत्याने 10 अंशांच्या खाली घसरले होते. 30 जानेवारी 2019 ला सर्वात कमी 4.6 अंश तापमानाची नोंद झाली. यासह 2015, 2016, आणि 2020 साली किमान तापमान अनुक्रमे 5.3, 5.1 आणि 5.7 अंश सेल्सिअस होते. गेल्यावर्षी 8 जानेवारीला सर्वात कमी 8 अंश तापमानाची नोंद झाली. यावर्षी मात्र पंधरवडा लोटूनही पारा सरासरीच्या खाली आला नाही. 


आणखी वाचा