Bacchu Kadu on Cabinet expansion :  माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे.  या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. मी आधी कोर्टाच्याच तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा ऐकत आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले. नागपुरातील सिंचन विभागाच्या विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


पुढे बच्चू कडू म्हणाले, माझ्या वाट्याला काय आलं, हे महत्वाचं नाही, तर माझ्या दिव्यांग बांधवांच्या वाट्याला मंत्रालय ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे 'तारीख पे तारीख' सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो 2024च्या निवडणुकांनंतर होईल, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले. 


...तर 2024 नंतरच होणार विस्तार


या विषयावर आम्ही काही चर्चा केली नाही आणि कुणाशी बोललोही नाही. पण सध्या चित्र असं दिसतंय. न्यायालय किंवा आयोगाचा निकाल लागल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर तो 2024च्या निवडणुकांच्या नंतर होईल, असे आपल्याला का वाटते? असे विचारले असता, आता या सरकारची मुदत संपण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. त्यातलेही शेवटचे सहा महिने निवडणुकीच्या तयारीत जातात. मग थोड्या कालावधीसाठी कशाला करायचा विस्तार? त्यामुळे मग कदाचित नाही करू. आमचे २० मंत्री सक्षम आहेत राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणि सरकार चांगले निर्णय घेत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. 


'जो जिंकणार, तोच होणार मंत्री' 


थोड्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ विस्तार करायचा आणि आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची, असा विचार कदाचित कुठेतरी होत असेल. त्यामुळे बहुतेक 2024च्या निवडणुका झाल्यानंतरच विस्तार होईल, असे वाटते. 2024च्या विधानसभा निवडणूकीत 'जो जिंकणार, तोच होणार मंत्री' , असे बच्चू कडू म्हणाले. कुणाच्या नाराजीचा काही विषय नाही. कारण एकनाथ शिंदे गट आणि भाजप राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आणि भाजपमधील कुणी बाहेर जाईल, अशी स्थिती नाही आणि तशी ताकतही कुणात नाही. मात्र इतर पक्षातील लोक शिंदे गट किंवा भाजपमध्ये येतील, अशी स्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले. 


 मंत्री व्हावं, म्हणून कधीही अट्टाहास नव्हता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले, यात आम्ही आनंदी आहो. नाही मंत्रिपद दिले तरीही या मंत्रालयाची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानू. दिव्यांग बांधवांसाठी आमची कालच बैठक झाली. त्यात चांगले प्रस्ताव तयार करून ते मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. तसंही मंत्री व्हावं, म्हणून माझा अट्टाहास कधीही नव्हता. आम्ही मागून मागून मागितलं काय, तर दिव्यांग मंत्रालय. कारण दिव्यांग बांधवांसाठी मोठे काम करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचेही आमदार कडू म्हणाले.


ही बातमी देखील वाचा...


मालमत्ता कर कमी करण्यासाठी 'सेटिंग'; मनपा कार्यालयात दलालाला रंगेहाथ अटक, कर निरीक्षकाचीही चौकशी