नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News)  येत्या 21 आणि 22 मार्च दरम्यान आयोजित G20 देशांच्या प्रतिनिधी मंडळ संमेलनाच्या माध्यमातून 'नागपूर संत्रा' ला प्राधान्य क्रमावर प्रमोट करण्याची मागणी महाऑरेंज या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संस्थेने केली आहे. नागपूरच्या G20 बैठकीच्या माध्यमातून आयोजकांनी नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून प्रमोट करण्यास प्राधान्य दिले आहे.  मात्र G20  संमेलनाच्या निमित्ताने नागपूरला टायगर कॅपिटल म्हणायचे की संत्रानगरी म्हणायचे याचा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.


नागपूरमध्ये सध्या 21 आणि 22 मार्च दरम्यान होणाऱ्या G 20 संमेलनाची तयारी जोरात सुरु आहे. ज्या भागात ही बैठक होणार आहे. त्या भागाचे सौंदर्यीकरणाचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.  यामध्ये शहराचे रस्ते, भिंती, इमारतीचे रंगरंगोटी केली जात आहे. नागपूर हे जागतिक दर्जाचे एक सुंदर शहर असल्याचे प्रशासनाला संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना दाखवायचे आहे. मात्र नागपूर शहराची ओळख म्हणून काय दाखवायचे याचा मात्र पेच निर्माण झाला आहे. कारण नागपूरच्या या G20 बैठकीच्या माध्यमातून आयोजकांनी नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून प्रमोट करण्यास प्राधान्यक्रम दिल्याने नागपूरचे संत्राउत्पादक शेतकरी नाराज झाले आहे. नागपूर संत्राला प्राधान्य क्रमावर प्रमोट करण्याची मागणी महाऑरेंज या संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या संस्थेने केली आहे. सध्या आयोजक यामुळे पेचात सापडले असून आम्ही टायगर कॅपिटल सोबत नागपूरची ऑरेंज सिटी म्हणून पण प्रमोट करत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.


खरंतर देशात नागपूरची ओळख ही संत्रानगरी म्हणूनच आहे. मात्र G 20 संमेलन हे जागतिक स्तरावरचे संमेलन आहे. त्यामुळे कदाचित आयोजकांनी टायगर कॅपिटलला अधिक प्राधान्य दिले असावे. मात्र नागपूरला टायगर कॅपिटल हा दर्जा कधी व का मिळाला? विदर्भ आणि मध्यप्रदेशचा सीमावर्ती भाग पकडला तर नऊ व्याघ्र प्रकल्प हे नागपूरपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. देशातील 80 टक्के वाघ याच भागात आढळत असून जगातील 50 टक्केपेक्षा अधिक वाघांचा अधिवास विदर्भ व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असल्याने केंद्र सरकारने एप्रिल 2011 मध्ये नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून घोषित केले होते. 


तर नागपूरच्या संत्र्याचा इतिहास हा 270 वर्ष जुना रघुजी राजे भोसले यांच्या काळापासूनचा आहे. नागपूर संत्र्यात जर काही वेगळेपण असेल तर ती त्याची एकत्र आंबट गोड चव ही जगात कुठल्याही संत्रामध्ये नाही. त्यामुळे नागपूरची खरी ओळख काय तर संत्रानगरी की टायगर कॅपिटल यात पेच फसला आहे. मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा टायगर कॅपिटलच्या प्रमोशनल विरोध नाही. 


G20 संमेलनाच्या माध्यमातून नागपूर संत्राला जागतिक स्तरावर मार्केटिंगची सुवर्णसंधी आहे व ती संधी हातची जाता कामा नाही, हीच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी  आहे. त्यामुळे G20  संमेलनाच्या निमिताने नागपूर शहराची जागतिक स्तरावरची ब्रॅण्डिंग ही वाघपूर म्हणून करायची की संत्रानगरी म्हणून करायची याचा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. यावर काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.