नागपूर : देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर (Nagpur News) शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठे महत्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे. श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वर्धा मार्गावरील पावनभूमी श्रीरामनगर येथे गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरचे (Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Center) आज शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी भूमिपूजन होत आहे. या डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी एम.आर.आय, सी. टी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाउंड, डायलिसिस यासारख्या खर्चिक वैद्यकीय चाचण्या अत्यंत रास्त दरात किंबहुना शासकीय रुग्णालयपेक्षाही कमी दरात केले जाणार आहे. त्यामुळे हे सेंटर गरजू रुग्णांसाठी मोठं वरदान ठरणार आहे.
शासकीय रुग्णालयांपेक्षाही कमी दरात उपचार
उपराजधानी नागपूर शहरात विदर्भासह लगतच्या राज्यातून अनेक लोक उपचारांसाठी येत असतात. या उद्देशाने रुग्णांच्या सेवेसाठी वर्धा मार्गावरील श्रीरामनगर मध्ये दोन माजल्याचे सर्व सेवांनी सज्ज असे गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटर तयार केले आहे. या सेंटरमध्ये गरीब रुग्णांसाठी एम. आर.आय, सी.टी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाउंड, डायलिसिस यासारख्या खर्चिक वैद्यकीय चाचण्या अत्यंत रास्त दरात, किंबहुना शासकीय रुग्णालयपेक्षाही कमी दरात केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या सेंटरवरील सर्व मशीन्स या जागतिक दर्जाची आहे, तसेच मशीन्सची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे रुग्णांना जलद आणि उत्तम सेवा अल्पदारात मिळणार आहे.
डायलिसिससाठी 25 मशीन्स; 24 तास सेवा
गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरमध्ये केवळ डायलिसिससाठी या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 25 मशीन्स आहेत. हे नागपुरातील कुठल्याही रुग्णालयाच्या डायलिसिस मशीनच्या संख्येपेक्षा सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी अवघ्या पाचशे रुपयांमध्ये डायलिसिस होणार असल्याने गरीब रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. हे डायग्नोस्टिक सेंटर 24 तास चालवले जाईल, त्यामुळे गरीब रुग्णांना इतर शासकीय रुग्णालयात ज्या पद्धतीने प्रतीक्षा यादी असल्याने अनेक दिवस थांबावे लागते तशा समस्येला सामोरे जावं लागणार नाही. शिवाय नागपूर विदर्भासह हे सेंटर लगतच्या राज्यातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कसं असेल डायग्नोस्टिक सेंटर?
गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे उपस्थित राहणार आहेत. नासुप्रने लीजवर दिलेल्या 16 हजार वर्ग फुटांच्या जागेवर हे सेंटर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी तळमाळ्यावर पार्किंग, प्रतीक्षागृह, कार्यालय, ओपीडी आणि पॅथॉलॉजी राहील. तर पहिल्या माळ्यावर एमआरआय सेंटर राहणार असून त्यात थ्री टेस्ला या तंत्रज्ञानाने परिपूर्ण दोन एमआरआय मशीन, 128 स्लाईसची सीटी स्कॅन मशीन, अल्ट्रा साऊंड आणि एक्स रे मशीन राहील. दुसऱ्या माळ्यावर किडनीच्या रुग्णांसाठी 25 डायलिसीस मशीन राहणार आहे.