Vidarbha Protest : राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना दुसरीकडे विदर्भवाद्यांनी या दिवसाचे औचित्य साधत आंदोलन केले. उपराजधानी नागपुरात विदर्भवाद्यांनी अनेक सरकारी कार्यालयांचे बोर्ड तसेच सूचना फलकांवर विदर्भ राज्य असे लिहिले आहे. महाराष्ट्र ऐवजी विदर्भ असे स्टिकरही काही ठिकाणी लावण्यात आले आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी गेले अनेक दशकांपासून महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. या दिवशी विदर्भ राज्यची मागणी अधिक जोरकसपणे केली जाते. त्याच अनुषंगाने विदर्भवाद्यांनी हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील अनेक फलकांवर विदर्भ राज्याचे स्टिकर लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सकाळी हे स्टिकर काढण्यास सुरुवात केली होती. विदर्भवाद्यांच्या या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्राचा विकास होत असला तरी विदर्भाकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विदर्भवाद्यांकडून सातत्याने केला जातो. महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी वेगळ्या राज्याची मागणी विदर्भवाद्यांकडून सातत्याने केली जाते.
२९ डिसेंबर १९५३ रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने प्रथम राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता. या आयोगासमोर माधव श्रीहरी अणे आणि ब्रीजलाल बियाणी या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली होती. १९५६ मध्ये विदर्भ हे द्विभाषिक मुंबई राज्याचा भाग झाला. विदर्भाच्या विकासाच्या अनुषंगाने आणि विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूरचे महत्त्व कायम राहावे यासाठी नागपूर करार करण्यात आला होता. या कराराचे पालन होत नसल्याचा आरोपही विदर्भवाद्यांकडून केला जातो.
शासकीय कार्यक्रमात घोषणाबाजीचा प्रयत्न
दरम्यान, नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर पालकमंत्री नितीन राऊत हे ध्वजारोहण करण्यासाठी येत असताना कस्तुरचंद पार्क मैदानाच्या मु्ख्यद्वारावर काही विदर्भवाद्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अहमद कादर या विदर्भवादी नेत्यांसह ५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.