नागपूर : नागपुरातील गोरेवाडा वन्य जीव बचाव केंद्रात एका बिबट्याने नऊ प्राण्याची शिकार केली. वन्य जीव बचाव केंद्रातील तृणभक्षक प्राण्यांच्या पिंजऱ्यात शिरुन बिबट्याने शिकार केली. मृत प्राण्यांमध्ये पाच चितळ, तीन काळवीट आणि एका चौसिंगाचा समावेश आहे.
बिबट्याने आठ प्राण्यांना पिंजऱ्यात मारलं, तर एका चितळाची शिकार पिंजऱ्याला जोडलेल्या इमारतीत घुसून केली. वन्य जीव बचाव केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मते काल (मंगळवारी) रात्री उशिरापासून आज पहाटेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली असावी.
विशेष म्हणजे ज्या पिंजऱ्यात बिबट्याने शिरकाव केला, त्याचं लोखंडी कुंपण तब्बल पाच मीटर उंचीचं होतं. शिवाय त्याला सौर ऊर्जेवर आधारित विशेष फेन्सिंगही करण्यात आलं होतं. त्यामुळे बिबट्याने ही उंची कशी ओलांडली, याबाबत कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
वीस दिवसांपूर्वीच लावलेल्या या सोलर फेन्सिंगमध्ये काही कमतरता असावी, किंवा मोठ्या आकाराच्या या पिंजऱ्यात शिरण्यासाठी एखादी फट बिबट्याला आढळली असावी, असा तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, गोरेवाडा वन्य जीव बचाव केंद्र आणि प्राणी संग्रहालयाचे क्षेत्र शेकडो एकर परिसरात विस्तारलेले आहे. इथे विदर्भातील वेगवेगळ्या जंगलातून जखमी अवस्थेत किंवा बेवारस अवस्थेत आढळलेले प्राणी उपचारासाठी आणले जातात. त्यानंतर इथेच त्यांचं योग्यरित्या पुनर्वसन केलं जातं.
इथे आणले गेलेले बिबटे विस्तीर्ण परिसरात मोकळे सोडले गेले आहेत. त्यामुळे अशाच मोकाट बिबट्यांपैकी एकाने ही शिकार केली असावी, असा अंदाज आहे.
वन्य जीव बचाव केंद्रातच बिबट्याकडून नऊ प्राण्यांची शिकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2019 02:43 PM (IST)
बिबट्याने आठ प्राण्यांना पिंजऱ्यात मारलं, तर एका चितळाची शिकार पिंजऱ्याला जोडलेल्या इमारतीत घुसून केली. वन्य जीव बचाव केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मते काल (मंगळवारी) रात्री उशिरापासून आज पहाटेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली असावी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -