नागपूर: बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयालगतच्या राखीव वनक्षेत्रात बिबट्याचा मृत छावा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोरेवाडा लगतच्या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातच आता मृत छावा आढळून आल्याने लगतच्या वसाहतींमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोरेवाड्याच्या पश्चिम भागातील मोकळ्या जागेत असलेल्या नाल्यात बिबट्याचा छावा असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. तिथे जाऊन बघितले असता बिबट्याचा मृत छावा आढळून आला. नर छावा केवळ 2 ते 3 दिवसांचा असावा असा अंदाज आहे. पाण्यात बुडालेल्या अवस्थेत तो सापडला. घटनास्थळावर पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासी गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले.  


घातपाताचा संशय नाकारला


वन्यप्राणी बचाव केंद्रातील चिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोलंगत व डॉ. मयूर पावशे यांनी शवविच्छेदन केले. त्यात या छाव्याचा मृत्यू पाण्यात बुडाल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वनअधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या घातपाताचा संशय नाकारला.


Nagpur Crime : आई-वडिलच नव्हे तर मोठी बहिणही करायची छळ; शंकरबाबालाही 12 पर्यंत पोलिस कोठडी


अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहन


शवविच्छेदनानंतर नियमानुसार मृतदेहाचे दहन करण्यात आले. यावेळी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत, सहायक वनसंरक्षक विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे, वनपाल सुरेश चाटे, वनरक्षक लता मांढळकर, वनमजूर राजन वासनिक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर, मुख्य वन्यप्राणी रक्षकांचे प्रतिनिधी म्हणून कुंदन हाते उपस्थित होते.


RTMNU Admission : महाविद्यालयात प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


कुंपण सुरक्षित असल्याचा दावा


बिबट्याचा छावा आढळून आल्याने परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये भीती व्याप्त आहे. अधिकाऱ्यांनी मात्र प्राणीसंग्रहालयाचे कुंपण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. बिबट अथवा अन्य कोणताही वन्यप्राणी बाहेर येऊन शकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रात बिबट्यांचा मुक्त अधिवास आहे. बिबट मादीने अलिकडेच छाव्याला जन्म दिला असावा. रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला होता. छाव्याला सुरक्षित स्थळी हलवित असताना पुरात सापडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


लोकांच्या हितासाठी कायदा तोडण्याचा आमचा अधिकार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


यापूर्वीही जिल्ह्यात बिबट्याच्या पाऊलखुणा


कन्हान नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सिहोरा शिवारात काही वर्षांपूर्वी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. काहींनी चक्क बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले. अशात नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून वनविभागाने त्या ठिकाणी पाहणी करून बिबट्याचा शोध घेण्यास सुरवात केली होती. रामटेक वनविभागाकडून बिबट्याच्या पाऊलखुणांच्या पाहणीसाठी चमू येऊन गेल्यावरही काही आढळले नव्हते. तारसा रोडमार्गे आठवडी बाजारातून जाणाऱ्या नागरिकांना वाघदरे वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला संध्याकाळी बिबट दिसला असल्याचा अंदाज वर्तविताच गोंधळ उडाला होता. परंतु संध्याकाळ असल्याने कुणी नानाविध तर्कवितर्क लावून मोकळे झाले. शनिवारी सकाळी परिसरातील अजय चकोले नामक शेतकरी सिहोरा शिवारातील शेतात गेले असता त्यांना शेतातील ओल्या मातीत एकसारख्या पाऊलखुणा आढळल्या होत्या.