Teachers Constituency Election Nagpur Division : केंद्रात आपली सरकार आहे कुणी आपले वाकडे करु शकणार नाही. तसेच राज्यातही तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार मिळवता येते असे विचार करुन सामान्यांच्या मागण्यांवर मुजोरी करणाऱ्या भाजपचा सहज पराभव शक्य आहे. त्यासाठी सर्वच समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.  


महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत.  या विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत नागपुरात जल्लोष सुरू केला आहे.  पहिल्या फेरीतच विजयश्री आमच्याकडे येईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले होते. यावेळी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना नाकारणे भाजपला भोवले असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. 


जुनी पेंशन नकारल्याने भाजपचा पराभव!


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ शकत नाही, असे वक्तव्य केले होते. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे, तेथे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मान्य केली आहे. तीच मागणी महाराष्‍ट्रात आमच्या कर्मचाऱ्यांकडून होते आहे. पेन्शन देऊ शकत नाही, अशी भूमिका ज्या पक्षाची आहे, त्या पक्षाचे समर्थन घेऊन जे प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. त्यांची ही स्थिती झाली आहे. प्राध्यापक, शिक्षक, आयटीआयचे निदर्शक किंवा इतर कर्मचारी असो, हा सामूहिक प्रश्‍न आहे. सामूहिक प्रश्‍नांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि निकाल आपल्यासमोर आहेत, असे सुधाकर अडबाले म्हणाले.  


आमच्या संघटना 'या' पक्षाच्या विचारसरणीच्या


आजच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेले बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र राहिलो. आम्ही पूर्वीपासून कॉंग्रेसच्या विचारांचे आहोत. सर्वच्या सर्व 34 संघटनांना आम्ही एकत्रित केले. त्यांच्यात एकमत घडवून आणले. सुधाकर अडबालेंना उमेदवारी दिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे भूमिका मांडली. आम्ही त्यांच्याच विचाराचे आहो, हे त्यांना सांगितले. शिक्षक मतदारसंघ हा संघटनांचा मतदारसंघ आहे, राजकीय नाही, हे आम्ही कॉंग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले. यामध्ये आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांनी ते मान्य केले.  


अरेरावीने राजकारण करणाऱ्यांसाठी इशारा..


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेले काम आणि संघटनांच्या एकजुटीचा हा विजय आहे. संघटनांचा विचार आणि महाविकास आघाडीचा विचार एक आहे. आम्ही एकत्र आल्यावर भाजप कुठे दिसणारच नाही, हे आज सिद्ध झाले. पहिल्या पसंतीमध्ये निकालाच्या घटना तुरळक आहे आणि नागपुरात हे घडले. विजयाची खात्री कॉंग्रेसला होती, साथ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने दिली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून आमच्या विजयी मालिकेला सुरुवात झाली, ती आता शिक्षक मतदार संघापर्यंत आली आहे. पुढे काय होईल, त्याचा विचार आमच्या विरोधी पक्षाने विचार करावा. अरेरावीने राजकारण करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे, असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.


ही बातमी देखील वाचा...


Cyber Attack : सैन्यासाठी 'ग्रेनेड्स' बनविणाऱ्या नागपुरातील सोलर समूहावर सायबर हल्ला; संवेदनशील डेटा चोरी, तपास CBI कडे?