नागपूर : एका वकिलाने दुसऱ्या वकीलावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोर वकिलाने या हल्ल्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर वकील हा त्या वरिष्ठ वकिलाकडे ज्युनिअर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 62 वर्षीय अॅड. सदानंद नारनवरे हे नागपूरच्या विधी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत होते. शुक्रवारी संध्याकाळी 4.50 च्या दरम्यान सदानंद नारनवरे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोर अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसले होते. तिथे लोकेश भास्कर हा त्यांचा ज्युनियर वकील आला. लोकेशने नारनवरे यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.
भर रस्त्यात एका वकीलावर दुसऱ्या वकिलाने केलेल्या या हल्ल्याने पळापळ झाली. नारनवरे यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतरही लोकेश भास्कर तिथेच उभा राहिला. ही घटना पाहणारे वकील जेव्हा त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा लोकेशने त्याच्या बॅगमधून थिमेट हे विषारी औषध काढून प्राशन केले.
त्यानंतर लोकांनी त्याला पकडून जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच गंभीर जखमी असलेल्या सदानंद नारनवरे यांना रुग्णालयात दाखल केले. लोकेशने विष प्राशन केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी रुग्णालयात नेले. परंतु उपचाराआधीच आरोपी लोकेश भास्करचा मृत्यू झाला.
अॅड. नारनवरे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपी लोकेश भास्कर काही दिवसांपूर्वीपर्यंत अॅड. नारनवरे यांच्याकडेच ज्युनियर म्हणून काम करत होता. परंतु एका ज्युनियर वकिलाने सिनियर वकिलावर असा हल्ला करून स्वतः आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही.