Mohan Bhagwat Full Speech : देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे, सर्वांची काळजी घेणार्यालाच हिंदू असं म्हणतात आणि हे फक्त हिंदुस्थानच करतो, असं मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित एका व्याख्यानात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं होतं. प्रतापनगर शिक्षण संस्थेनं हे व्याख्यान आयोजित केलं होतं.
जगात बाकी सगळीकडे मारामारी होत आहे, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हमास आणि इस्रायलमध्येही युद्ध होत आहे. मात्र, आपल्या देशात अशा मुद्द्यावर कधीही भांडण झालेलं नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही, याचं कारण आपण हिंदू आहोत, असं आहे आणि हा हिंदूंचा देश आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच जीवनाचं आपण अनुकरण करावं असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे, घोड्यावर बसण्या एवढं सोपं नाही, त्यांनी ज्या गुणांचा आधारावर कर्तृत्व गाजवलं ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहेत. त्यांना काय करायचं ते स्पष्ट होतं, काय करायचं हे माहीत होतं. हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही, लोकांची दयनीय अवस्था, महिला सुरक्षित नाहीत. महिलांची दुर्दशा पाहून शोक त्यांचा मनात होता, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
हिंदूंनी मुस्लिमांचा सांभाळ केला : सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत बोलताना म्हणाले की, "शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र,आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात. वडीलांकडून मिळालेलं बाळकडू यामुळे विचार स्पष्ट होतो. हा हिंदूच देश आहे. हिंदू म्हणजे, मुस्लिम लोकांचा सांभाळ केला. हे भारतच करू शकतो."
युक्रेन लढाई, हमास युद्ध आपल्या काळात अशी लढाई झालेली नाही. आपण भांडत नाही म्हणून आपण हिंदू आहे, असा देश असला पाहिले, ज्यात आई सुरक्षित असेल. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आली. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी राजा झाले. आपण एकटे असलो तरी असुरक्षित आहोत. आपल्याला माणसं राखता आली पाहिजेत. तेव्हा आपण सुरक्षित असतो, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.
महाराजांनी मित्रांचा गोतावळा जमवला : सरसंघचालक मोहन भागवत
शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरुवात केली. लोकांना वसवलं. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमानं जोडले. मित्रांचे दोष प्रेमानं दूर केले, संकटात मदत करत मैत्री केली, असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
मुसलमानांशी वैर नव्हतं : सरसंघचालक
तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचे विदेशी मुसलमानांशी भांडण होतं. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभं केलं, त्यामुळे त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असंही सरसंघचालक म्हणाले. तसेच, अफजल खान लोकांना त्रास देत असताना धैर्य ठेवून योग्य वेळेची वाट पाहिली. अफजल खान याला भेटायला जाऊन त्याचा डाव त्याच्यावरचं उलटवणं हे साहस आणि धैर्य बुद्धी चातुर्य महाराजांमध्ये होतं, असंही सरसंघचालक म्हणाले.