नागपूर : गृहमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात गुन्हेगारांना पोलिसांचा काडीमात्र ही धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आपण चित्रपटात पहातो त्याच पद्धतीने काही सराईत गुंड पोलीस कर्मचाऱ्याचा रस्त्यावर पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचे एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहे.


नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये 16 सप्टेंबरच्या रात्री पोलीस हवलदार रवी चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे हे सीसीटीव्ही फुटेज असून गुन्हेगारांनी त्यांना भर रस्त्यावर कशा पद्धतीने जीवे मारण्याचा केला हे या सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून येत आहे. कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवी चौधरी यांनी कमलेश मेश्राम आणि त्याच्या भावाच्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली होती. त्याच्याच राग धरून मेश्राम बंधूनी इतर दोघांच्या मदतीने रवी चौधरी यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. 16 सप्टेंबरच्या रात्री साडे आठच्या सुमारास कमलेश मेश्राम याने फोन करून रवी चौधरी यांना कांहांमधील गहू हिवरा चौक बोलावले होते. तिथे रवी चौधरी पोहचल्यावर काही वेळ सर्वांमध्ये चर्चा झाली. आणि त्याच चर्चेत वाद विकोपाला जाऊन कमलेश मेश्राम, आमण खान या दोघांनी चाकूने रवी चौधरी यांच्यावर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी रवी चौधरी रस्त्यावर धावले. मात्र, गुंडांनी त्यांचा पाठलाग करत काहीच अंतरावर त्यांना गाठले. दोन्ही गुंडानी हातातल्या चाकू आणि लाथा बुक्क्यांनी चौधरी यांच्यावर वार करणे सुरु केले. चाकूचे वार पोटावर झाल्यामुळे चौधरी खाली कोसळले. त्यानंतर दोन्ही गुंडांनी त्यांच्यावर वार करणे सुरूच ठेवले.


वर्दी घातलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुंड भर रस्त्यात हल्ला करत असताना ही अनेक लोकं थांबून हा गोंधळ पाहत होते. मात्र, कोणीही पोलिसाच्या बचावासाठी समोर आले नाही हे ही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या रवी चौधरी यांना रस्त्यावर तसेच सोडून आरोपी निघून गेले. पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन रवी चौधरी यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर अजून ही उपचार सुरु आहे. नंतर याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार कमलेश मेश्राम, अमान खान, कपिल रंगारी यासह एकूण चार आरोपींना अटक केली. मात्र, या घटनेमुळे नागपूर जिल्ह्याच्या भर रस्त्यावर गुंड कायद्याला तसूरभरही न घाबरता थेट पोलिसाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात असे दुर्दैवी चित्र या सीसीटीव्ही मधून समोर आले.