नागपूर : वडिलांनीच आपल्या दारुड्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. बुधवारी मध्यरात्री दारुच्या पैशासाठी मुलाचा त्याच्या आईसोबत वाद झाला. या वादातून वडिलांनी सुतार काम करण्याच्या अवजाराने मुलावर वार केले.
संजय बाळापुरे असं मृत मुलाचं नाव असून सुमारे 2 महिन्यांपूर्वीच तो खुनाच्या आरोपातून तुरुंगातून बाहेर आला होता. तर दामोदर बाळापुरे (वय 71 वर्षे) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
संजयला दारुचे व्यसन होते आणि त्यामुळे पैशासाठी तो वृद्ध आई वडिलांना मारहाण देखील करायचा. बुधवारी मध्यरात्री दारुच्या पैशांसाठी संजयचा त्याच्या आईसोबत वाद झाला. वाद सोडवायला गेलेल्या वडिलांनाच संजयने मारहाण केली. या वादात आरोपी दामोदर यांनी सुतार काम करण्याच्या अवजाराने संजयवर वार केले. ज्यात संजयचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील दामोदर बाळापुरे यांना ताब्यात घेतले आहे.
हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गतच्या अलंकार नगर येथे दामोदर बाळापुरे पत्नी आणि मुलगा संजय यांच्यासोबत राहत होते. संजय हा विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे.