Indian Science Congress Nagpur :  नोएडा येथील 130 मीटर उंच 32 व 29 मजल्याचे ट्विन टॉवर (Noida Twin Tower demolition) पाडण्याचा देशातील पहिला प्रयोग ऑगस्टमध्ये करण्यात आला होता. माध्यमांनी या घटनेचे थेट प्रसारण दाखविल्यामुळे देशातील सर्वच नागरिकांनी हा थरार अनुभवला. परंतु ही इमारत पाडण्यासाठी वापरलेली स्फोटके नागपुरातून मागविण्यात आले होते, हे रहस्य इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये उलगडले. ही इमारत पाडण्यासाठी तीन हजार 700 किलोपेक्षा जास्त स्फोटके वापरण्यात आली होती. 


ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ट्विन टॉवर पाडण्यात आले होते. येथे अॅपेक्स ही 32 मजल्यांची तर सेयॉन ही 29 मजल्यांची इमारत होती. या इमारतीत एकूण 850 फ्लॅट होते. ही इमारत सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रुरकीच्या (सीबीआरआय) मार्गदर्शक तत्वानुसार पाडण्यात आली. अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने सीबीआरआयचे स्टॉल लागले असून बहुमजली इमारत पाडण्याचे मॉडेल लक्ष वेधून घेत आहे. ही बहमजली इमारत पाडण्याची तांत्रिक प्रक्रिया उलगडताना स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डेटा सायन्सचे संशोधक डॉ. सुमनकुमार व डॉ. नविन निशान यांनी नागपुरातील एका स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीकडून इमारत पाडण्यासाठी स्फोटके मागविण्यात आल्याचे नमूद केले. परंतु त्यांनी कंपनीच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली. सुरक्षेच्या कारणावरून असे दोघांनीही स्पष्ट केले.


103 मीटर उंच बहुमजली इमारत स्फोटकांच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग होता. देशातील या पहिल्याच प्रयोगात उपराजधानीचे योगदानही मोठे असल्याची बाब यानिमित्ताने आज उघडकीस आली. देशातील विविध भागात असे आणखी काही प्रकल्प सीबीआरआयकडे आले असल्याचे त्यांनी नमूद केले.


शेजारच्या इमारतींचे स्ट्रक्टरल विश्लेषण


ही इमारत पाडताना तयार होणाऱ्या कंपणामुळे अडीचशे मीटर परिसरातील इमारतींना धोका होता. परंतु बाजूच्या इमारतीचे स्ट्रक्चरला विश्लेषण करण्यात आले. परिसरातील इमारती पडण्याच्या स्थितीत तर नाही, याबाबतची पूर्ण माहिती घेण्यात आली. कंपणांच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतरच इमारत पाडण्यात आल्याचे संशोधक डॉ. सुमनकुमार यांनी सांगितले.


नोंदणी न करताही विज्ञान प्रदर्शनीला भेट


नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील प्रवेशद्वारावरुन प्रवेश केल्यावर सरळ गेल्यास उजव्या बाजूला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदणी करता येते. नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणा-या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण ए ते एफ असे सहा हॅाल असणार आहेत. हॅाल ए मध्ये आयआयटी मद्रास, इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील (Nagpur) अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॅालमध्ये असणार आहेत. 


ही बातमी देखील वाचा...


चांद्रयान- 3 ची तयारी पूर्ण, जून-जुलैमध्ये लॉंचिंग; इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची माहिती