नागपूर : दिवाळीला फटाके फोडण्याचा उत्साह चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच असतो. हीच बाब लक्षात घेत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी या संस्थेने पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांची निर्मिती केली आहे. या फटाक्यांचा वापर केल्यास वायू प्रदूषण कमी होईलच शिवाय ध्वनी प्रदूषणापासून देखील मुक्ती मिळणार आहे.


फटाक्यांमधील काही घटकांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला फटाके फोडण्यासंदर्भात नियमावली बनवत काही निर्बंध घातले.


नीरीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक फटाक्यांना 'स्वास', 'सफल' आणि 'स्टार' अशी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये छोटे बॉम्ब, मोठे बॉम्ब आणि अनार (फ्लावर पॉट) चा समावेश आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये 33 टक्के अल्युमिनियम, पोटेशियम नायट्रेट 57 टक्के आणि सल्फर 9 टक्के असं रसायन मिश्रण असते. या मिश्रणामुळे फटाके मानवासाठी तसेच पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक ठरतात.


या रसायनामुळे सल्फर डायऑक्साईड तसेच नायट्रोजन डायऑक्साईड या विषारी वायूचे कण हवेत मिसळतात आणि वायू प्रदूषण होते. याशिवाय मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणही होते.


मात्र नीरीतर्फे तयार करण्यात आलेल्या या फटाक्यांमध्ये हानिकारक आणि विषारी रसायने नाहीत. त्यामुळे या ग्रीन फटाक्यांचा वापर केल्याने हवेत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा हानिकारक प्रदूषण 60 टक्क्यांपर्यंत कमी होते, असं नीरीच्या संशोधकांच्या चाचणीमध्ये सिद्ध झालं आहे.


एक वर्षापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नीरी, सीएसआयआर, एनसीएल अशा अनेक केंद्रीय संशोधन संस्थांना ग्रीन फटाक्यांवर संशोधन करण्याचे कार्य सोपवले होते. तिन्ही संशोधन संस्थांनी गेल्या वर्षभरात दिवसरात्र कार्य करून आता काही ग्रीन फटाके तयार केले असून ते सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले आहे.


या फटाक्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारात आणण्यापूर्वी त्याचे उत्पादन करू इच्छिणाऱ्यांनी पेसो म्हणजेच पेट्रोलियम अॅन्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून मंजुरी आणि परवाने मिळविणे आवश्यक आहे.  मंजुरी मिळाल्यानंतर ग्रीन फटाक्यांचं व्यावसायिक उत्पादन सुरु करता येणार आहे.


दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी हे लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांचच पहिलं आकर्षण असतं. मात्र, पर्यावरणाची ढासळती अवस्था पाहता त्याचे समतोल साधने ही तितकेच महत्वाचे आहे. आता शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे ग्रीन फटाके भविष्यात आतषबाजी संदर्भात लोकांना उत्साह आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यात मोलाची कामगिरी बजावणार आहे.