Nagpur Crime News : लहान मुलं हट्ट करतात, त्यांना हवी असलेली एखादी गोष्टी नाही मिळाली तर ते काय करतील याचा नेम नसतो. पण, असं लहानमुलांसारखं एखादी मोठी जबाबदार व्यक्ती वागली तर? नागपुरमध्ये घडलेल्या एका प्रकारावर सध्या संताप व्यक्त केला जात आहे. नागपुरातील (Nagpur) जिल्हा परिषदेच्या (Nagpur District) आरोंग्य केंद्रातील डॉक्टरनं वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे शस्त्रक्रिया सोडून आरोग्य केंद्रातून थेट काढता पाय घेतला. धक्कादायक प्रकार म्हणजे, ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती, तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशिया देण्यात आला होता. दरम्यान, डॉक्टरांच्या या कृत्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला. शस्त्रक्रिया नियोजित होती, त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले खरे, पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळालं नाही. यावर डॉक्टरांना राग अनावर झाला आणि डॉक्टर आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले.
डॉक्टरांच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांची चौकशीचे आदेश दिले आहेत.
दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्यानं त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्यानं ते तिथून निघून गेल्याचं चौकशीतून समोर आल्याचं डॉ. भलावी यांनी सांगितलं आहे. त्यानंतर खात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केल्याची माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.