नागपूर :   स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 


यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना कापरं भरलं आहे. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असा नाना पटोले यांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटतंय. मात्र नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवायची गरज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना का भासत आहे याचा उत्तर तेच देऊ शकतात, असं फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
 


महाविकास आघाडीत काँग्रेस एकटी पडली  : भाजप नेते प्रवीण दरेकर


"आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः तिन पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तिन पक्षाच्या सरकारमध्ये आपापसातच सुसंवाद नसेल, समन्वय नसेल, तर राज्याच्या जनतेला आपण काय देणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्य एका वेगळ्या वळणावर आहे, असं मला वाटतंय. कारण नाना पटोलेंची अशी वक्तव्य दररोज येत आहेत. तसेच इतर मित्र पक्षांकडून त्यांना प्रत्युत्तरही दिलं जातंय. हे राज्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे. कारण नाना पटोले सांगतात की, स्वबळाची भाषा केल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरतेय, याचा अर्थ नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय की, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. तसेच यापूर्वी त्यांच्या अनेक नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात सूतोवाचही केलं आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस एकटी पडल्याचं दिसतंय.", असं प्रवीण दरेकर म्हणाले. 


Exclusive : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...


नाना पटोलेंचा गैरसमज झालाय : शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे


"नाना पटोले यांचा काहीतरी गैरसमज झालाय. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोन ते तीन वेळा स्वबळाचा नारा त्यांनी दिला. त्यावर आम्ही कोणीच काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अद्यापही प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांचा काहीही गैरसमज झाला असेल तर महाविका आघाडी सरकामधील तिनही पक्षांचे नेते खंबीर आहेत, तो दूर करण्यासाठी. तिघांमध्ये समन्वय आहे. मुख्यमंत्री सध्या कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत." असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे बोलताना म्हणाल्या.