मुंबई : स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मोठा बॉम्ब फोडलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात बोलताना केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असही नाना पटोले म्हणाले आहेत. अशातच काही वेळापूर्वी समोर आलेल्या खळबळजनक वक्तव्याविषयी नाना पटोले यांच्याशी एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी नाना पटोले यांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले बोलताना म्हणाले की, "तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी हे बोललो खरं आहे की, पक्ष वाढीसाठी मी स्वबळाचा नारा दिला होता. मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? हे माझं वक्तव्य आहे." तसेच पुढे बोलताना म्हणाले की, "पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नाही. मी मुंबईत आल्यावर याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया देईन.", असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी दिल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीतील अनेक नेते महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत होते. यामध्ये खुद्द नाना पटोले यांचाही समावेश होता. पण, नाना पटोले मतभेद नाहीत असं एकीकडे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नाना पटोले यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही महाविकास आघाडीत मतभेद आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यांचा समाचार घेतला होता. लहान व्यक्तींवर मी बोलत नाही, असं भाष्यही शरद पवारांनी केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप