नागपूर : कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे अंत्यंसंस्कार महापालिका किंवा नगरपालिकेचे कर्मचारीच करतात. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक केलेले असल्याने कुटुंबियांना आपल्या व्यक्तीचा चेहरा पाहणेही शक्य होत नाही. मात्र, आता नागपूरच्या संशोधकांनी विकसित केलेल्या अतिनील किरणांवर आधारित नवीन यंत्राच्या मदतीने कोरोनाबाधितांचे मृतदेह पूर्णपणे निर्जंतुक करणे शक्य होणार आहे. सध्या हे यंत्र प्रायोगिक तत्वावर शासकीय वैद्यकीय (मेडिकल) रुग्णालयाला देण्यात आले असून ते यशस्वी ठरल्यावर त्याचा वापर करून कोरोनाबाधित मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रिया व्यक्तीचा चेहरा दाखविणे शक्य होणार आहे.


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आधीच आपली प्रिय व्यक्ती, माणूस गमावल्याचं दुःख असते. त्यात कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे मृत व्यक्तीचे अंतिम दर्शन करणे ही त्यांना शक्य होत नाही. आयसीएमआरच्या नियमाप्रमाणे ज्या रुग्णालयात कोरोना बाधिताचा मृत्यू होतो त्याच रुग्णालयातील कर्मचारी कोरोना बधिताचे मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेऊन महापालिकेच्या हवाली करतात. आणि महापालिकेचे कर्मचारी स्मशानभूमीवर नेऊन त्या व्यक्तीच्या धर्मानुसार अंत्यविधी करतात. अंत्यविधीच्या या प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील मोजक्याच लोकांना उपस्थित राहता येते. आणि संपूर्ण प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांना एका कोपऱ्यात उभे राहून ती प्रक्रिया पाहण्यापलीकडे काहीच करता येत नाही. त्यामुळे आपला व्यक्ती गेल्यानंतर ही त्याचा चेहरा सुद्धा पाहू न शकल्याचे खंत त्यांच्या मनात राहाते.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक संजय ढोबळे, सेवादल महिला महाविद्यालयाच्या डॉ निरुपमा ढोबळे आणि दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक निलेश महाजन या तीन संशोधकांनी अंत्यविधीच्या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्याना किमान मृतदेहाच्या जवळ जाऊन मृत व्यक्तीचे अंतिम दर्शन करता येईल, त्याला सुरक्षित अंतरावरून फुले वाहता येईल एवढी सुरक्षितता आणण्यासाठी एक यंत्र विकसित केले आहे. "डेड बॉडी युवी सॅनिटायझिंग युनिट" असे या यंत्राचे नाव असून या यंत्रात अल्ट्रा व्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणांचा वापर करण्यात आला आहे. मृतदेह ठेवलेले प्लास्टिकचे बॅग मृतदेहासह या यंत्रातील स्ट्रेचरवर ठेवल्यास अतिनील किरणांच्या 5 मिनिटांच्या माऱ्यामुळे मृतदेह आणि त्याचे प्लास्टिकचे बॅग पूर्णपणे निर्जंतुक होते असा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे मृतदेहापासून संक्रमाणाचा धोका टळतो आणि मृत व्यक्तीचे नातेवाईक, मित्र परिवार ठराविक अतंर ठेऊन त्यांचे अंतिम दर्शन करू शकतात, धार्मिक विधीनुसार फुले वाहू शकतात.


पाहा व्हिडीओ : कोरोना मृत व्यक्तीचं अंतिम दर्शन आता घेता येणार? नागपुरात संशोधन



रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत मृतदेहाची हाताळणी करणारे महापालिकेचे कर्मचारी ही अनेक वेळा कोरोना बाधित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णालयातच मृतदेह ठेवलेली बॅग मृतदेहासह यंत्रात ठेऊन निर्जंतुक केली तर रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत मृतदेहाची हाताळणी करणारे कर्मचारी ही संक्रमणापासून सुरक्षित राहतील.


सध्या प्रा संजय ढोबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे यंत्र नागपूरच्या सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय ( मेडिकल ) ला प्रायोगिक तत्वावर दिले आहे. एकदा रुग्णलयाने मृतदेहांच्या निर्जंतुकीकरणासाठी हे यंत्र उपयुक्त असल्याचे मान्य केले. त्यानंतर "डेड बॉडी युवी सॅनिटायझिंग युनिट" च्या माध्यमातून कोरोना बाधितांच्या मृतदेहांना निर्जंतुक करून त्यांच्या आप्तस्वकीयांना त्यांच्या अंतिम दर्शनाची संधी देता येईल असा विश्वास प्रा ढोबळे यांनी व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


नागपुरात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक, दिवसागणिक दोन हजार रुग्ण!


नागपुरात ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्सही उशारीने आली