नागपूर : राज्याच्या उपराजधानीत आरोग्य व्यवस्था एका आजारी वृद्धाला रुग्णालयात बेड उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्याचवेळी तिच्या मृत्यूनंतर वेळेवर अॅम्ब्युलन्सची व्यवस्थाही ती व्यवस्था करू शकत नाही. नागपुरात कोरोना बेलगाम होत असताना राज्य सरकार आणि महापालिका दोघांची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.


नागपूरच्या मित्रनगर परिसरात 65 वर्षांच्या कृपाबाई राठोड या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या जीवनातील शेवटचे दोन दिवस उपराजधानीत आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार आणि कोरोना संदर्भात प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करणारे ठरले आहे. मित्रनगर परिसरात राहणाऱ्या कृपाबाई राठोड कोरोना बाधित होत्या. दोन दिवसांपूर्वी रात्री त्यांची तब्येत खालावत असल्याने कुटुंबियांनी नागपूरचे मेयो आणि मेडिकल या दोन्ही मोठ्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न केले. मात्र कृपाबाई यांना दाखल करून घेण्यात आले नाही. राठोड कुटुंबाने शहरातील अनेक खाजगी रुग्णालयातही चौकशी केली, मात्र सगळीकडे बेड उपलब्ध नाही असंच त्यांना सांगण्यात आलं.


त्यामुळे निराश झालेल्या राठोड कुटुंबियांनी घरीच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करत कृपाबाई यांना घरी ठेवले. मात्र कृपाबाई यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागले. अखेरीस काल घरीच त्यांचा मृत्यू झाला.


मात्र त्यानंतर ही कृपाबाई यांच्यावरील संकट टळले नाही. राठोड कुटुंबियांनी कोरोना बाधितरुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचे नियम असल्याने त्याचे पालन करण्याचे ठरवले आणि कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्याच्या मृत्यूची माहिती महापालिकेला दिली. पहाटेच ही माहिती दिल्यानंतर सर्व कुटुंबीय कोरोनाबाधिताचा मृतदेह घरात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर उभे राहून महापालिकेचे कर्मचारी आणि अॅम्ब्युलेन्सची वाट पाहू लागले. मात्र काही तासानंतर महापालिकेची अॅम्ब्युलेन्स मृतदेह घेऊन जाण्यासाठी आली. तोवर मृतदेहाला मुंग्यासुद्धा लागल्या होत्या. दुःखाच्या प्रसंगातही राठोड कुटुंबीय मृतदेह घराच्या आत आणि कुटुंबिय घराबाहेर आशा अवस्थेत अनेक तास बसून होते.


कृपाबाई यांच्यावर उशिरा का होईना अंत्यसंस्कार झाले. मात्र जी व्यवस्था एका आजारी वृद्धाला रुग्णालयात एक बेड मिळवून देऊ शकत नाही, तीच व्यवस्था मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी वेळेवर एक अॅम्ब्युलेन्स ची व्यवस्था ही करू शकत नाही. उपराजधानीच्या शहरासाठी यापेक्षा जास्त दुर्दैवी आणि लाजिरवाणे काय असेल.