नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसातच नागपुरात कोरोनाचे 13 हजार 608 नवे रुग्ण सापडले आहेत. परवा, 8 तारखेला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2 हजार 205  कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यापासून एका दिवसातली आजवरची ही सर्वाधिक वाढ आहे. या दिवशी 37 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. मात्र, सर्वात जास्त भीतीदायक आहे की, कोरोना चाचण्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण. ते मार्च महिन्याच्या तुलनेत दहा पटीने तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह नागपुरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तर्क मान्य केले तरी दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची संख्या वाढणे हे धोक्याची घंटा आहे.


नागपुरात 17 ऑगस्ट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत तत्कालीन आयुक्त आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांची बैठक घेत नागपुरात कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला होता. चाचण्या वाढवल्याने काही दिवस नागपुरात रुग्ण वाढतील मात्र त्यांनतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल असे त्यांचे तर्क होते. त्यानंतर महापालिका आणि आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले. 17 ऑगस्ट पर्यंत दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान असलेली कोरोना चाचण्यांची संख्या आता आठ हजारांच्या वर गेली आहे. नागपुरात 8 सप्टेंबर रोजी 8 हजार 308 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये 2 हजार 205 जण कोरोना बाधित आढळले. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे हे स्पष्ट दिसतंय. मात्र, जास्त धोकादायक बाब म्हणजे दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या.


कसा वाढला नागपुरात कोरोना


# मार्च महिन्यात नागपुरात दर शंभर चाचण्यामागे अवघे 2.40 टक्के कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.
# जुलै महिन्यात दर शंभर चाचण्यामागे 7.5 टक्के कोरोना बाधित रुग्ण आढळत होते.
# तर ऑगस्ट महिन्यात दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण 13.78 टक्के झाले होते.
# सप्टेंबरच्या पहिल्या आठ दिवसात दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांचे प्रमाण तब्बल 24 टक्के झाले आहे.
# म्हणजेच दर शंभर कोरोना चाचण्यांमागे नागपुरात सप्टेंबर महिन्यात मार्चच्या तुलनेत दहा पटींची तर ऑगस्टच्या तुलनेत दुपटीची वाढ झाली आहे.


प्रशासन मात्र कोरोनाच्या वाढत्या केसेस बद्दल लोकांना जबाबदार मानून मोकळं होऊ पाहत आहे. नागपूर महापालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या मते कोरोनाच्या वाढत्या प्रकरणासह महापालिकेने रुग्णालयांची संख्या ही वाढविल्याचा दावा केला आहे. खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय व्हायचे असल्यास दिवसात परवानगी देत असल्याचे कुकरेजा म्हणाले. त्यामुळे महापालिकेने आरोग्य यंत्रणा मजबूत केली आहे. मात्र, सामान्य नागरिक कोरोना संदर्भातल्या नियमांचे पालन करत नाही आहे असे सांगत कुकरेजा यांनी वाढत्या रुग्ण संख्येचा खापर लोकांच्या अनुशासनहीनतेवर फोडला आहे.


दिल्ली सह देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढवून संक्रमणाला नियंत्रित करण्याचे प्रयत्न झाले आहे. त्याच धर्तीवर नागपुरात ही तसेच प्रयत्न केले जात आहे. त्याचे परिणाम कसे येतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, दिवसागणिक दीड आणि दोन हजार रुग्णांची वाढ सध्या तरी नागपुरतील विद्यमान आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेच्या पलीकडची बाब होत आहे. त्यामुळे नागपुरात लवकरात लवकर या कोरोना वाढीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये प्रशासनासह नागपूरकर नागरिकांनी ही अनुशासन पाळून सहयोग करणे अत्यावश्यक आहे.