covid-19 study : कोरोनामध्ये कोमॉर्बिड रुग्णांना जास्त धोका असल्याचे आधीपासूनच सांगितले जात आहे. मात्र, नागपुरातील एका रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्सनी त्यासंदर्भात खास अभ्यास करून कोरोनाचा सर्वाधिक त्रास आणि धोका मधूमेह, उच्चरक्तदाब असलेल्यांना असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना झालेल्या १ हजार ७६३ रुग्णांचा कोरोना काळातील आणि नंतरच्या काळात त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहे. या अभ्यासानुसार कोरोनच्या दोन्ही लाटेत नागपुरात रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचा सरासरी मुक्काम हा ६ दिवसांचा होता. मात्र, मधूमेह व उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम सहा दिवसांहून बराच अधिक असल्याचे दिसून आले. त्याच प्रकारे कोरोना झालेल्यांपैकी मधूमेह व उच्चरक्तदाब या दोन्ही व्याधी असलेले ४९.६ टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते... अशा रुग्णांच्या मृत्युचा धोका ही सामान्य रुग्णांपेक्षा ४.३३ पटीने अधिक असल्याचा निष्कर्ष क्रिम्स हॉस्पिटलच्या अभ्यासातून निघाला आहे. ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या नेतृत्वात हा अभ्यास करण्यात आला.
नागपूरच्या क्रिम्स रुग्णालयाने कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान त्यांच्याकडे उपचार केलेल्या रुग्णांचा खास अभ्यास केला असून नागपुरात कोरोनाची पहिली लाट ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान तर दुसरी लाट ही मार्च २०२१ ते जुन २०२१ दरम्यान होती.. नागपुरात दुसर्या लाटेदरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणांवर प्रभाव पडल्याचेही या अभ्यासातून दिसून आले. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत तरुणांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेत अधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. पहिल्या लाटेत ७५.२ टक्के रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागला तर दुसर्या लाटेत ८८.५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. लक्षणांच्या अनुषंगाने तुलनात्मक अभ्यासाचा निष्कर्ष असं स्पष्ट करतो की, घसा खवखवणे हे लक्षण दुसर्या लाटेच्या तुलनेत पहिल्या लाटेत अधिक आढळून आले होते. याशिवाय कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशक्तपणा (विकनेस) हे लक्षण सर्वात अधिक ५९ टक्के रुग्णांमध्ये आढळून आले. याशिवाय कफ (५५%), ताप(४९%), डोकेदुखी(१२%), श्वास घेण्यास त्रास (५०%), अंगदुखी (२१%), भूक मंदावणे (१७%) ही लक्षणेही आढळून आली.
रुग्णालयात दाखल होणार्या एकूण रुग्णांमध्ये महिलांची टक्केवारी ३३.५ तर पुरुषांची टक्केवारी ६६.५ होती. या अभ्यासानुसार २५ टक्के रुग्णांना सिटी संच करण्याची गरज भासली नाही.. म्हणजेच त्यांच्यात फुफ्फुसात संक्रमण अत्यंत सौम्य होते.. ३३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य, २७ टक्के रुग्णांमध्ये मध्यम तर १५ टक्के रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचे संक्रमण फुफ्फुसात झाले होते. पोस्ट कोविड उपचारांमध्ये एक तृतीयांश रुग्णांना पोस्ट कोविड फायब्रोसिसने ग्रासले तर अनेक रुग्णांना कोविडपश्चात अशक्तपणा, मायल्जिया(अंग व स्नायुदुखी), ब्रोन्कायटिस, चिंताग्रस्तता (अॅन्जायटी)चा त्रास आढळून आला.
नागपुरात झालेला कोरोना रुग्णांचा तुलनात्मक अभ्यास
लक्षण | पहिली लाट | दुसरी लाट |
अशक्तपणा | ५३.५ % | ६३.८ % |
कफ | ४९.४% | ६१.० % |
ताप | ४१.८% | ५६.८ % |
थंडी वाजून ताप | २९.७ % | २४.८ % |
भूक मंदावणे | १८.१ % | १५.५ % |
ओला खोकला | १६.१ % | १०.५ % |
अंगदुखी | १५.३ % | २६.८ % |
डोकेदुखी | १२.१ % | १२.८ % |
घसा खवखवणे | ११.१ % | ५.५ % |
दुसर्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक अशक्तपणा, कफ, ताप आणि अंग दुखी आढळून आली. घसा खवखवण्याचे प्रमाण पहिल्या लाटेत अधिक होते.
आजाराप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांची तुलना
आजार | पहिली लाट | दुसरी लाट |
उच्चरक्तदाब | ४२ % | ३३ % |
मधूमेह | २९ % | २४ % |
हृदयविकार | ७.२३ % | २.५ % |
हायपोथायरॉईड | ६.३२ % | ५.३ % |
यावरून असे स्पष्ट होते की पहिल्या लाटेत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. तर दुसर्या लाटेमध्ये अन्य विकार असलेल्या रुग्णांनाही कोरोनाने मोठ्या प्रमाणात ग्रासले होते.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पसरण्याची शक्यता असून त्याचे संसर्ग दर डेल्टा व्हेरियंट पेक्षा जास्त आहे.. डेल्टा व्हेरियंटचे संसर्ग दर ५ ते ६ टक्के होते.. मात्र, ओमायक्रॉन व्हेरियंटचे संसर्ग दर १० ते ३० टक्के आहे... मात्र, ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत सौम्य लक्षणे देणारा व्हेरियंट असण्याची शक्यता आहे... मात्र, ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा जे कोमॉर्बिड आहेत त्यांना ओमायक्रॉनचा जास्त धोका राहील... त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे असे आवाहन डॉ अशोक अरबट यांनी केले आहे...