Nagpur Crime News : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (staff selection commission exam) परीक्षेला बोगस उमेदवार (Bogus Candidate) बसवून परीक्षा उत्तीर्ण करत प्राप्तिकर विभागात (Income Tax Department) भरती झालेल्या नऊ कर्मचाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली. अटक केलेल्यांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते कोणतीही माहिती देत नसले तरी येथील प्राप्तिकर विभागात काम करणाऱ्या 50 जणांची नावे समोर आली आहे. त्याचा तपास केला जात असून, सीबीआयने कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे विभागात खळबळ उडाली आहे.


मार्च 2018 मध्ये सीबीआयला तक्रार मिळाली होती. त्यात 2012 ते 2014 दरम्यान झालेल्या कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत बोगस उमेदवार बसवून परीक्षा उत्तीर्ण करत प्राप्तिकर विभागात काही जणांनी नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयला काही कर्मचाऱ्यांची नावे मिळाली होती. प्रकरणाच्या तपासात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. 


या कर्मचाऱ्यांची नावे समोर


नऊ कर्मचारी बोगस उमेदवारांच्या माध्यमातूनच सेवेत आले होते. हा खुलासा झाल्यानंतर सीबीआयने स्टेनोग्राफर रिंकी यादव, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमारला अटक केली. आता सीबीआय या सर्वांच्या जागी परीक्षेला बसलेल्या बोगस उमेदवारांचा शोध घेत आहे. काही लोकांची नावे आणि नंबर सीबीआयच्या हाती लागले. याशिवाय नागपूर प्राप्तिकर विभागातील 50 जणांची नावे सीबीआयकडे आहेत. त्याचा तपास सुरु आहे.


मोठे रॅकेट येणार उघडकीस


चौकशीत आरोपी कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, सीबीआयला माहिती मिळाली आहे की, बोगस उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी लाखो रुपये देण्यात आले. आरोपींनी ही रक्कम कुठून आणली? कुठे आणि केव्हा आरोपींनी बोगस उमेदवारांशी 'सेटिंग' केली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले. त्यामुळे यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतरही सर्व कर्मचारी सेवेत कायम होते. इतकेच नाहीतर विभागीय स्तरावर त्यांना बढतीही देण्यात आली. लवकरच बोगस उमेदवारांचाही शोध लावण्यात येईल, असा दावा सीबीआयचे अधिकारी करत आहे.


संबंधीत बातमी...


CBI Nagpur : आयकर विभागाचे 9 'मुन्नाभाई' गजाआड; डमी उमेदवार बसवून मिळवली होती नोकरी