Nagpur Bjp News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेगानं हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, जागावाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच नागपूर ग्रामीणमधील (Nagpur Rural) सहाही विधानसभेच्या जागा कमळाच्या चिन्हावर लढण्यावर भाजप ठाम आहे. आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी रामटेकमधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर भाजप आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळं आशिष जयस्वाल यांनी कोणत्या चिन्हावर लढायचं हा त्यांचा निर्णय असल्याचे मत नागपूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे (BJP leader Sudhakar Kohle) यांनी सांगितलं.
शिंदे गट आणि अजित पवार गटाला नागपूरममध्ये काय मिळणार?
आम्ही उमरेड विधानसभेत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती देखील नागपूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली. तर राजू पारवे काँग्रेसच्या चिन्हावर आमदार झाले होते. त्यामुळं उमरेडमध्ये भाजप आपले चिन्ह सोडणार नसल्याचे कोहळे म्हणाले. त्यामुळं एकनाथ शिंदे गट व अजित पवार गट यांना नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा सुटणार? याबद्दल प्रश्न चिन्ह कायम आहे. रामटेक लोकसभा ही शिंदे गटाला सुटल्याने रामटेक विधानसभा आता भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आशिष जैस्वाल धनुष्यबाणावर किंवा अपक्ष म्हणून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं रामटेकच्या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. जागावाटप झाल्यानंतरच नेमकी परिस्थिती काय होणार हे समोर येणार आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महिला कार्डचा प्रयोग करणार
पूर्व नागपूर विधासभा मतदारसंघ भाजपचा नागपूर मधील सर्वात मजबूत गड असल्याने काँग्रेसचे प्रस्थापित नेते तिथून लढायला फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळं काँग्रेसने तिथून महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा तयारी सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशच्या जेष्ठ नेत्यांनी संगीता तलमले यांना तयारीला लागायला सांगितले आहे. संगीता तलमले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याची संपर्क यात्रा पूर्ण केली आहे. लवकरच त्या दुसऱ्या टप्प्यातील संपर्क यात्रेला सुरुवात करणार आहेत. मात्र तीन टर्मचे आमदार असलेले कृष्णा खोपडे यांना आव्हान देणे काँग्रेससाठी तितके सोपे नसल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: