Nagpur News Update : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा मुलगा कुणाल राऊत पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांच्या दबावामुळेच नागपुरात भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा आणि इतर भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. 


जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकारी पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्या दबावात काम करत आहेत. भाजप कार्यालयावर कालच्या हल्ल्याच्या घटनेबद्दल दोषी काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करून त्यांना अटक करत नाहीत, तोपर्यंत भाजपचे कार्यकर्ते रोज जरीपटका पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण करतील असे देखील भाजपने जाहीर केले आहे. या प्रकरणी पोलिसांवर भाजप नेत्यांचा दबाव असून पोलीस या दबावात काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने देखील केला आहे. पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 


सुगत नगर आणि जवळपासच्या वस्तीतील नागरिकांच्या समस्या स्थानिक नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांना सांगण्यासाठी काल काँग्रेसचे स्थानिक नेते बाबू खान यांच्या नेतृत्वात काही महिला काँग्रेस कार्यकर्त्या कुकरेजा यांच्या जरीपटका परिसरातील कार्यालयात गेल्या होत्या. तेथे सुरुवातीला दोन्ही पक्षात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर हाणामारीही झाली. यात कुकरेजा यांच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने देखील भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला होता.


भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान सोबत आलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करून कार्यालयातील फर्निचरच्या तोडफोडीचा आरोप केला होता. दोन्ही पक्षांनी काल जरीपटका पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी नोंदविल्या होत्या.


पोलिसांनी काल रात्री दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकून भाजप नगरसेवकाच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग आणि मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर काँग्रेस नेते बाबू खान विरोधात मारहाण, विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र आता दोन्ही पक्षांनी या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईला राजकीय दबावाने केलेली कारवाई संबोधून एकमेकांवर आरोपांची मालिका सुरू केली आहे.


महत्वाच्या  बातम्या