Nagpur Crime News : नेहमीच कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चेत राहणाऱ्या नागपुरात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे सामुहिक बलात्काराची पहिली घटना 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत घडली असून सामूहिक बलात्काराची दुसरी घटना 65 वर्षाच्या एका वृद्ध महिलासोबत घडली आहे. या घटनांमुळे राज्याची उपराजधानी हादरली आहे.
65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार
नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत लावा परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार करण्यात आला. या पीडित वृद्धेच्या घरी पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी आरोपींनी प्रवेश केला. दोघांनी एकट्याच राहणाऱ्या वृद्धेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने गुरुवारी वाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसर्याचा शोध सुरू आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नागपुरच्या जाफर नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. गुरुवारी पीडितेच्या तक्रारीवर रात्री उशिरा अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात 4 आरोपी असून आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली होती. रविनगर परिसरातून मंगळवारी तो तरुण त्या तरुणीला बाईकवर जाफर नगर परिसरात घेऊन गेला होता. तिथे एका फ्लॅटमध्ये त्याने अल्पवयीन मुलीला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीच्या काही मित्रांनीही तरुणीचे शारीरिक शोषण केले. आरोपींनी रात्रभर त्या तरुणीला गुंगीच्या अवस्थेत त्याच फ्लॅटमध्ये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवून दिले. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर तरुणी गप्प होती. मात्र काल तिची तब्येत बिघडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला डॉक्टरकडे नेले आणि ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात चार तरुणांना आरोपी करत त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या चारही आरोपी फरार आहेत.