Nagpur News : भारतीय मानक ब्युरोनं मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.


भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) BIS नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे एक कोटी पाच लाखांचे दागिने जप्त केले. राज्यात  नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली. त्यावरून नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 2.75 किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले. 


छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचा उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे बीआयएस चे लक्षात आले होते. त्यानंतर विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. मात्र, बनावट हॉलमार्कचे दागिने तयार होतातच कसे?, बीआयएसच्या केंद्राला त्यासाठी जबाबदार धरायला हवे? असा सवाल स्थानिक ज्वेलर्स संचालकानी उपस्थित केला आहे.


नागपुरात इतवारीतील सराफा बाजारात एका ठिकाणी काल बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्या ठिकाणी वर्ष 2021 पासून बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंग च्या नियमांचे उल्लंघन करून जुन्याच पद्धतीने ग्राहकांना सोन्याचे दागिने विकले जात होते. तसेच नियमबाह्य पद्धतीने दागिन्यांवर बीआयएसच्या लोगोसह शुद्धतेचे तपशील नमूद केले जात होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याशिवाय मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात दोन ठिकाणी, मुंबईतील अंधेरीमध्ये एका ठिकाणी, ठाण्यात जांभळी नाक्याजवळ एका ठिकाणी तर पुण्यात रविवार पेठेतील एका ज्वेलर्सवर ही अशीच कारवाई करण्यात आली आहे.


बीआयएसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे,1 जुलै 2021 पासून 40 लाख पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर बीआयएसचा लोगो, त्या दागिन्यांची शुद्धता दाखवणारी माहिती, तसेच सहा अंकी युनिक आयडेंटिटी कोड बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्दिष्टाने हे नियम घालण्यात आले असतानाही अनेक ज्वेलर्स अजूनही त्याचा पालन करत नाही. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना सराफा व्यवसायिकांकडून भिंग मागून त्या दागिन्यावर बीआयएसचा लोगो, दागिन्याची शुद्धता दर्शवणारी माहिती, तसेच सहा अंकी युनिक आयडेंटिटी कोड आहे की नाही हे तपासावे. तसेच प्रत्येक खरेदी संदर्भात बिल घ्यावे असे आव्हान बीआयएसचे अधिकाऱ्यांनी केले आहे.


हॉलमार्कच्या नियमांमध्ये सुधारणा


सोन्याची शुद्धता तपासण्यापूर्वी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे की, भारत सरकारने दागिन्यांवर हॉलमार्कच्या नियमांमध्ये केलेली सुधारणा 1 जुलै 2021 पासून देशभर लागू करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, दागिन्यांवर हॉलमार्किंगचे एकूण तीन गुण आहेत. पूर्वी हे चार ते पाच असायचे. तीन गुणांमध्ये हॉलमार्क, शुद्धता ग्रेड आणि सहा अंकी अल्फान्युमरिक कोड असतात.


एचयूआयडी कोड


सहा अंकी अल्फान्युमरिक कोडला एचयूआयडी म्हणतात. यामध्ये अक्षरे तसेच अंकांचा समावेश होतो. नवीन नियमांनुसार, देशात निर्मित प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांना एक युनिक एचयूआयडी कोड दिलेला आहे. यामुळे दागिन्यांची शुद्धता तपासण्यात मदत होते.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur News : तरुणांनो 'स्पोर्ट्स'ची नशा करा, द ग्रेट खलीचे तरुणाईला आवाहन; खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप