Nagpur : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या  राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपली सेवा प्रभू रामाच्या चरणी करत आहे. यामध्ये देशाच्या हृदयस्थानी असलेले आणि खवय्येगिरीत अग्रनी असलेले नागपूर कसे मागे राहील?  महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर  (Vishnu Manohar) हे अयोध्येत प्रभू श्री रामचरणी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे. प्रभूश्रीराम जन्मभूमी अयोध्येतील भव्य मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. 


विश्वविक्रम प्रभू श्रीरामाचा चरणी अर्पण 


प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे अनेक विश्व विक्रम नोंदविले आहे. यंदाच्या वेळी विशेष बाब म्हणजे या शिऱ्यासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपुरात तयार केली जात आहे. शेकडो किलो वजनाची ही कढई लवकरच अयोध्येच्या दिशेने रवाना केली जाईल. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील विविध मंदिरात या कढईचे विशेष पूजनही केले जाणार आहे. यासाठी लागणारे पदार्थ देशातील वेगवेगळ्या ठिकाणातून अयोध्येत आणले जाणार आहे.


शिऱ्यासाठीचा खास रवा नागपुरातून जाणार आहे, तर खास तूप तिरुपतीवरून आणले जाणार आहे. शिऱ्यात टाकला जाणारा सुकामेवा काश्मीरमधून आणण्यात येईल. "हा विक्रम माझा वैक्तिक नसेल, तर तो प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतूनच हाती घेतला आहे.", अशी भावना विष्णू मनोहर यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. 


कारसेवा ते पाकसेवा 


राम हलवा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ तीन तासांचा कालावधी लागणार आहे. आम्ही सकाळी 6 वाजता हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर, आम्ही त्यातील नैवेद्य म्हणून भगवान रामाला देऊ. मंदिर आणि शहरातील भक्तांमध्ये स्वयंसेवकांमार्फत हा प्रसाद वितरित करण्यात येणार असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. मी यापूर्वी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो. आता पाकसेवेसाठी जाणार आहे. माझ्यासाठी ही फार भाग्याची गोष्ट असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.


इतके साहित्य लागणार


हा शिरा तयार करण्यासाठी 700 किलो रवा,  700 किलो तूप,  1120 किलो साखर,  1750 लिटर दूध,  1750 लिटर पानी, 21 किलो इलायची पावडर,  21 किलो  जायफळ पावडर, 100 डझन केळ,  50 किलो तुलसी पत्ते,  300 किलो काजू किसमिस बदाम आदी साहित्य लागणार आहे. 


विशेष कढईत तयार होणार शिरा


श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या वतीने हा विश्वविक्रमी हलवा एकाच कढईत तयार होणार आहे. सुखामेवा शिजवण्यासाठी नागपुरात खास कढई तयार करण्यात आली आहे. ज्याचे वजन सुमारे 1,300-1,400 किलो आहे. कढईचा व्यास 15 फूट आहे आणि तिची खोली 5 फूट आहे. कढई स्टीलची असून मध्यवर्ती भाग लोखंडाचा बनलेला आहे. जेणेकरून शिरा शिजवताना जळणार नाही. 22 जानेवारीला मुख्य सोहळा असल्याने सर्वसामान्यांना अयोध्येत प्रतिबंध आहे. यामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आल्याचे विष्णू मनोहर यांनी दिली.  


इतर महत्वाच्या बातम्या