नागपुर: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विदर्भवासियांची मुंबईवारी टाळण्यासाठी मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), यांचे नागपुरात कार्यालय आहे. त्यात विशेष कार्यसीन अधिकारी देखील नियुक्त केला आहे. आता त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू केले आहे. नागपूरच्या विभागीय कार्यालयातील  'विजयगड' बंगला  कार्यान्वित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून सचिन यादव हे येथील जबाबदारी सांभाळणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आता शासकीय कामाकरता मुंबईला फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. 


नागपूर विभागीय कार्यालय कार्यान्वित


नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावी. मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत. या उद्देशाने अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे.  नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे. विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी श्री. सचिन यादव यांच्याशी   9421209136 वर  संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.


देवेंद्र फडणवीस पाठोपाठ अजित पवार यांचेही नागपुरात कार्यालय


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या विदर्भात पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याकरीत त्यांनी वेळोवेळी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री कक्ष नागपुरात असावे, अशी कल्पना त्यांना गेल्या आधिवेशनाच्या काळात बोलून दाखवली होती. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. या कार्यालयासाठी वेगळा विशेष कार्य अधिकारी (OSD) नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. हिवाळी अधिवेशन संपल्यांनतर काही दिवसांतच नागपूर येथे  कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यालय असून त्यांचे येथे विशेष कार्यसीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू केले आहे. 


ही बातमी वाचा: