नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे (Nagpur Winter Session) कामकाज सुरु असताना, विधानसभेत पत्रकार गॅलरीतून घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला. विदर्भाच्या (Vidarbha) मुद्द्यावर एका वृत्तपत्राच्या संपादकांनी विधानभवनात गोंधळ केला. यावेळी त्यांनी वेळ वाया घालवण्यासाठी विदर्भात हिवाळी अधिवेशन सुरु असून फक्त लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी अधिवेशन घेतलं जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी चर्चा बंद करुन विदर्भावर चर्चा सुरु करण्याच्या घोषणा देखील यावेळी दिल्या आहेत. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कारवाईची मागणी केली. 


विधानसभेचे कामकाज सुरु असताना पत्रकार गॅलरीत घडलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा असा सवाल उपस्थित केला. काल संसदेत घडलेल्या घटनेनंतर विधानसभेच्या पत्रकार गँलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी ही मागणी मान्य करत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 


नेमकं काय घडलं?


विधानसभेमध्ये चर्चासत्र सुरु असताना पत्रकार गॅलरीमधून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या घोषणा एका वृत्तपत्राच्या संपादकांनी दिल्या. हे संपादक विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते देखील आहेत. त्यावेळी आशिष शेलार यांनी विधानसभेत भाषणाला सुरुवात केली होती. सुरु असलेलं चर्चा सत्र थांबवून विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. यावर आशिष शेलार यांनी या संपादकांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान तात्काळ तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. 


या संपादकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. बुधवार 13 डिसेंबर रोजी संसदेत देखील असाच काहीसा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभेत घडलेल्या या प्रकारावर विधानसभेत उपस्थित असणाऱ्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालिका अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपादकांना तात्काळ सभागृहाच्या बाहेर काढले. दरम्यान यावेळी या संपादकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. आता या मुद्द्यावर विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


संसदेत गोंधळ 


लोकसभेच्या कामकाजादरम्यान बुधवार 13 डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली.  मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. खासदारार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुषंगाने चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा : 


PM Modi :  ही बाब गांभीर्याने घ्या, कोणत्याही प्रकारच्या राजकारणात पडण्याची गरज नाही, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना