Anti Sleep Alarm : देशातील महामार्गावर (highway) रात्रीच्या वेळेला घडणाऱ्या अपघातांची कारणमीमांसा केली. तर लक्षात येते की 70 ते 75 टक्के अपघात वाहनचालकाला झोप लागल्यामुळे घडतात. मात्र, नागपुरातील (Nagpur) गौरव सवालाखे (Gaurav Sawalakhe) या तरुणाने त्यावर एक अफलातून उपाय शोधून काढला आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
गाडी चालवताना झोप येतेय? अफलातून उपाय
महाराष्ट्रात वर्ष 2021 मध्ये 29 हजार 291 अपघात घडले असून त्यात 13 हजार 348 जणांचा मृत्यू झालाय. तर 15 हजार 922 लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अभ्यासानुसार यापैकी अनेक अपघात आणि मृत्यू चारचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाला ऐनवेळेला डुलकी लागल्यामुळे घडले आहेत. नागपुरात त्याच्या अफलातून संशोधनासाठी आधीच रेंचो म्हणून ओळख असलेल्या गौरव सवालाखे या तरुणाने झोपेमुळे घडणाऱ्या अपघातांना थांबवण्यासाठी अफलातून उपाय शोधला आहे. गौरवने अँटी स्लिप अलार्म विकसित केले असून अवघ्या दीड इंच आकाराचे हे यंत्र ब्लूटथ किंवा इयरपिस सारखे सारखे कानात घालावे लागतात. त्यानंतर यंत्र घालणाऱ्यांची मान 30 अंश वाकली की यंत्रामधील अलार्म जोरात वाजायला सुरुवात होते. तसेच यंत्र वायब्रेट ही होते. हे अँटी स्लिप अलार्म 85 डेसिबल आवाजाने वाजते. त्यामुळे कार मधील चालकच नाही तर सोबतचे प्रवासीही सहज अलर्ट होतात....
लोकांचे जीव वाचवण्यासाठी यंत्र विकसित करण्याचे ठरविले
काही महिन्यांपूर्वी गौरवने त्याच्या कारमधून नागपुरातून नेपाळपर्यंत प्रवास केला होता. रात्रीच्या वेळेस कार चालवताना झोपेचा त्याला त्रास जाणवला. आणि त्याच वेळेस गौरव ने रात्री चारचाकी ने प्रवास करणाऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी काहीतरी यंत्र विकसित करण्याचे ठरविले. संशोधक वृत्तीच्या गौरवने आधी प्रोटोटाईप अँटी स्लिप अलार्म बनविले. त्यात 3.6 व्होल्ट ची बॅटरी वापरली असून एक ऑन आणि ऑफ स्विच ही लावले आहे. हे प्रोटोटाइप गौरव गेले अनेक दिवसांपासून स्वतः वापरत असून तो शंभर टक्के यशस्वी आहे, याची खात्री झाल्यानंतर आता गौरव इतर वाहनचालकांसाठी भविष्यात या अँटी स्लिप अलार्मचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा विचार करतो आहे.
स्टार्टअप च्या माध्यमातून उत्पादनापर्यंत नेण्याचा विचार
कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जेमतेम पॉलीटेक्निक पर्यंत शिक्षण पूर्ण करणारा गौरव सुरुवातीपासूनच चिकित्सक वृत्तीचा आहे. मानवी जीवनातील समस्या दिसून आल्यानंतर त्याच्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी मात करायची या बद्दल गौरवचा मेंदू विचार करायला लागतो. आणि काही दिवसांनी तो एखादा अफलातून संशोधन घेऊन समोर येतो. अनेक वर्षांपूर्वी विद्यार्थीदशेतच गौरवने मोबाईल कंट्रोल हेलिकॉप्टर विद कॅमेरा बनवला होता. त्यानंतर तेच तंत्र आज अनेक dron कॅमेरा मध्ये वापरले जाते. त्यानंतर गौरवने मोबाईल फोनचे रेडिएशन कमी करणारी चिप तयार केली होती. त्याशिवाय लहान मुलांसाठी जीपीएस ट्रेकिंग आयडी कार्ड, अंध लोकांसाठी सेन्सर लागलेली स्मार्ट काठी असे अनेक संशोधन ही गौरवने केले आहे. आता अँटी स्लिप अलार्म लवकरच स्टार्ट अप च्या माध्यमातून उत्पादनापर्यंत नेण्याचा त्याचा विचार आहे. त्यासाठी एखाद्या कंपनीने साथ दिली तर नक्कीच गौरवचे हे संशोधन सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा!
- राणेंच्या बंगल्याच्या बांधकामात अनियमितता, केंद्रकडूनही सीआरझेडची नोटीस : महापौर किशोरी पेडणेकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha