Landslide : सरकार माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीनंतर आणखी काही गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राज्यात दरड (Landslide) कोसळू शकते अशा संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल राज्याचं मदत व पुनर्वसन विभागच (Ministry of Relief & Rehabilitation) गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (Maharashtra Remote Sensing Application Centre) या तज्ज्ञ संस्थेसोबत अनेक वेळेला बैठक होऊनही दरड कोसळू शकते अशा संभाव्य ठिकाणांचा अभ्यास करण्याचं काम मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरसह इतर कुठल्याही संस्थेला सोपवलेलं नाही.
"राज्य सरकारने परवानगी दिली तर आम्ही एका वर्षाच्या आत राज्यातील दरड कोसळण्यासंदर्भात संभाव्य धोकादायक ठिकाणांचं डिटेल मॅपिंग म्हणजेच "लँडस्लाईड हॅझार्डस झुनोशन मॅप" तयार करुन सरकारला अहवाल सोपवू शकतो. त्या संदर्भातला तंत्रज्ञान आणि क्षमता आमच्याकडे आहे," महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर म्हणजेच MRSAC चे प्रमुख दिलीप कोलते यांनी एबीपी माझालाही माहिती दिली आहे.
'मदत व पुनर्वसन विभागासोबत दोन वेळा बैठका, पण फलित नाही'
धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात MRSAC ने राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला एक प्रस्तावही पाठवला असून विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दरड कोसळू शकतात अशा संभाव्य ठिकाणांचा सखोल मॅप तयार करण्याच्या विषयावर दोन बैठकाही झाल्या आहेत. मात्र, या बैठकांचं काहीही फलित निघालेलं नाही. त्यामुळे अनेक वेळेला चर्चा होऊनही मदत व पुनर्वसन विभागाने दरड कोसळू शकते अशा संभाव्य धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करण्याचा काम महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर किंवा अन्य कोणत्याही संस्थेला सोपवलेलं नाही. त्यामुळे सरकार माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीनंतर आणखी काही गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या जाण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
VIDEO : Irshalgad Landslide : कडक ऊन आणि तुफान पाऊस, जमिनीची धूप झाल्यानं इर्शाळवाडीवर दरड कोसळली?
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर
रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस झाले आहेत. काल (21 जुलै) दिवसभरात सहा मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. अजून 86 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळवाडीत बुधवारी दरड कोसळली आणि48 पैकी 17 घरे गाडली गेली. बचावकार्य गुरुवार सकाळपासूनच सुरु झालं. पण मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. शिवाय पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने काल इर्शाळवाडीत एनडीआरएफचे जवान वगळता सर्वांना वर येण्यास मनाई करण्यात आली आहे.