महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मिमिक्री करुन ज्या भाजपवर हल्लाबोल केला. राजकारणासाठी त्याच भाजपसोबत जाणे योग्य नसल्याचे मत अबू आझमी यांनी मांडले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या एका भूमिकेवर कायम राहावे, वारंवार धरसोड करु नये असा सल्लाही आझमी यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहावे -
मुंबईत सर्वांनी मिळून उद्धव ठाकरे यांना मजबूत केले पाहिजे. भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे, असेही अबू आझमी म्हणाले. मुंबईत राहूनही एवढ्या वर्षात कधीच उद्धव ठाकरे यांना भेटलो नव्हतो. मात्र, आता त्यांना भेटल्यावर ते उत्कृष्ट व्यक्ती असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांना साथ देत असल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडली हे महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब असल्याचे मतही अबू आझमी यांनी व्यक्त केले. भविष्यात मुंबईतील निवडणुकीत शिवसेनेसोबत जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ते त्यावेळी ठरवू, असे सांगत दारे खुली ठेवली आहेत.
आम्ही एकही कागद देणार नाही -
मतं घेताना नरेंद्र मोदी यांनी कोणताही पुरावा मागितला नाही. मात्र, आता लोकांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे मागितली जात आहेत. मोदींनी कितीही पुरावे मागितले तरी आम्ही एकही कागद देणार नाही, असा इशारा ही अबू आझमी यांनी दिला आहे. एकप्रकारे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
संबंधित बातमी - मनसेने कार्यपद्धती बदलल्याशिवाय युती नाही, देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना रेड सिग्नल
BJP-MNS Alliance | मनसेने कार्यपद्धती बदलली तर युती शक्य - देवेंद्र फडणवीस | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha