Nagpur Crime News : शेतातील कापूस व तुरीच्या पिकात बसलेल्या एका महिलेवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. मात्र त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसानी (Nagpur Police) संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतातील पिकांत बसलेल्या महिलेच्या डोक्यावर एका अज्ञात इसमाने जाड आणि धारदार शस्त्राने वार करुन तिला गंभीर जखमी केले. त्या महिलेचा काल, सोमवारी (16 जानेवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी शिवारात घडली असून, तिच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही घटना शुक्रवारी (ता. 13 जानेवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती.
भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
शोभा अशोक कराडे (37, रा. सुरेवाणी, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शुक्रवारी दुपारी ठेक्याने केलेल्या शेतातील कापूस वे तुरीच्या पिकात एकटी बसली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यावर जाड आणि धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने तिला नागपूर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शोभाचा भाऊ जितेंद्र माणिक कोचे (30, रा. कोटलबरी, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) याने शनिवारी (दि. 14) पोलिसात तक्रार दाखल केल्याने खापा पोलिसांनी भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
आबू ऊर्फ दिनेश उईके (वय 21, रा. सुरेवाणी) हा घटनेच्या वेळी शोभाच्या शेतात आला होता, अशी माहिती शोभाचा भाऊ जितेंद्र कोचे याने पोलिसांना दिली होती. घटनास्थळी रक्त पडून असल्याचे तसेच शोभाचा मृत्यू घातपात असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
भावानेच हडपला प्लॉट, तयार केले खोटे दस्तावेज
दुसऱ्या एका घटनेत वडिलांनी विकत घेतलेला प्लॉट त्यांच्या निधनानंतर एका मुलाने हडपला व चार भावा-बहिणींचा विश्वासघात केला. त्याने खोट्या दस्तावेजांचा आधारे त्या प्लॉटवर कर्जही काढले. पोलिसांनी फसवणूक करणारा भाऊ व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संदीप इंगळे (वय 40, भोले नगर, पिपळा रोड) आणि त्याची पत्नी अनुपमा यांनी ही फसवणूक केली. अनिल इंगळे (54, राजगृहनगर) हे वडिलोपार्जित प्लॉटवर राहतात. त्यांच्या प्लॉटवर एकूण सहा बहीणभावांचा मालकीहक्क होता. एका भावाचे निधन झाले. संदीप अगोदर अनिल यांच्यासोबतच राहायचा. संदीप लग्नानंतर सासरी राहायला गेला. जाताना तो वडिलांचे मृत्यूपत्र आणि जागेची रजिस्ट्री घेऊन गेला. त्याने प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करुन पत्नीच्या नावे विक्रीपत्र केले. त्यानंतर त्याने प्लॉटवर कर्ज काढले. पोलिसांनी आरोपींना अटक केली.
ही बातमी देखील वाचा...