Nagpur News : एक भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी आला. त्याने दर्शन घेतले, हनुमंताला नमस्कार केले, प्रसादही ग्रहण केला. मात्र परिक्रमा घालताना त्याला हनुमंताची पितळेची गदा दिसली. त्याने ती गदा पिशवीत ठेवून निघून गेला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रिका बाजार परिसरातील हनुमान मंदिरात घडली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास भाविक मंदिरात आला होता.
रात्री उशिरा मंदिरातील पुजारी यांना हनुमानाच्या गदेसह इतर काही पूजेचे साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी मंदिर कमिटीने घटनेची तक्रार कन्हान पोलीस स्टेशनला दिली. तक्रार होताच परिसरात देवाची दगा चोरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेवर विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. हनुमंताच्या गदेचा शोध घेण्यासाठी विविध प्रयत्न केले जाऊ लागले. यासंदर्भात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती मिळाल्यावर त्याची तपासणी केली. यामधून हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडीओ अनेकांपर्यंत पोहोचला आणि गदा पिशवीत टाकून घेऊन जाणारी व्यक्ती गावातीलच असल्याचे काही नागरिकांनी ओळखले.
व्हिडीओ व्हायरल झाल्याने घाबरला
व्हिडीओ व्हायरल झाल्याने आपण पकडले जाऊ या भीतीने गदा घेऊन जाणारा भाविकच गदा परत घेऊन आला. हनुमंताचा साक्षात्कार झाल्याचे सांगत चोरटा सकाळी साडेअकरा वाजता मंदिराम गदा घेऊन प्रकटला तिथे उपस्थित मंदिर कमिटीच्या सदस्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मंदिर गाठत त्याला ताब्यात घेतले. माझ्या हातून नकळत चूक झाली अशी कबुलीही त्याने दिली. अशा प्रकारे हनुमंताला गदा परत मिळाली. गदा घेऊन जाणारा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे कुटुंबिय सांगतात. तर हा भाविक अनेकदा लोकांच्या वस्तू उचलून घेतो अशी माहिती पोलिसांना त्याच्या कुटुंबियांनी दिली. सध्या हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात आहे.
राज्यात मंदिरातून चोरीच्या अनेक घटना
जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीची घटना घडली होती. त्या घटनेला महिन्याभरापासून जास्त वेळ झाला आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील बेलेश्वर मंदिरातील पंचधातूचा देवाचा मुकुट आणि शेषनागाची मूर्ती चोरीला गेल्याने राज्यात देवच सुरक्षित नसल्याने माणसांचे काय होणार असा प्रश्न भाविकांना पडला आहे. दरम्यान चोरीच्या घटनांमुळे भाविकांच्या संयमाची मात्र परीक्षा होताना दिसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur ZP : नागपूर झेडपीत चाललंय काय? जिल्हा परिषदेत कॉंग्रेसमधील नाराज गट भाजपच्या मदतीला!