Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेत एक वेगळंच राजकारण घडण्याची शक्यता आहे. झेडपीत कॉंग्रेस (Congress) हा सर्वात मोठा पक्ष असला तरी इच्छुकांची गर्दी सांभाळण्याची कसरत नेत्यांना करावी लागत आहे. सत्तेसाठी कॉंग्रेसमधील नाराजांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील नाराज भाजपच्या (BJP) गळाला लागल्याचा दावा काही भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.


जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद (Zilla Parishad President) अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वाधिक अनुसूचित जमातीचे सदस्यही कॉंग्रेसकडे आहे. अशात कॉंग्रेसने उमेदवारी देताना इच्छुकांची भावना न सांभाळल्यास, भाजप त्या संधीचे सोने करु शकते. 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसमधील इच्छुकांची गर्दी लक्षात घेता कॉंग्रेस आपला उमेदवार वेळेवर घोषित करणार असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने पहिल्या टर्ममध्ये अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व दिले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपदेखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सक्षम पर्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.


भाजपकडून बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा?


भाजपकडे अनुसूचित जमातीचा (Scheduled Tribe candidates) उमेदवार आहे. पण, समीकरण जुळले तर बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचीही तयारी भाजपने केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे पक्षात पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याने भाजपच्या सदस्यांकडून ठोसपणे दावेदेखील केले जात आहे. सत्तेसाठी ऐनवेळी गणित जुळवून आणण्यात आमदार टेकचंद सावरकर (MLA Tekchand Savarkar) यांचा हातखंडा आहे. आमदार झाल्यानंतरही ते जिल्हा परिषदेच्या राजकारणात अॅक्टिव्ह होते. त्यामुळे कॉंग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेण्याच्या तयारीत भाजप असल्याचे दिसून येत आहे.


उमेदवार शेवटच्या क्षणीच


नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावर माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसची बैठक पार पडली. बैठकीला माजीमंत्री राजेंद्र मुळक, सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे,  रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह कॉंग्रेसचे सर्वच सदस्य उपस्थित होते. परंतु, कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीत अधिकृत निर्णय झाला नाही. निवडणुकीच्या दिवशीच उमेदवाराचे नाव घोषित होईल, असे कॉंग्रेस नेत्यांनी ठरवले असल्याची माहिती आहे.


नाराज नेते भाजपच्या संपर्कात


जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसच्या मागिल अडीच वर्षांच्या कारभारात अनेक कॉंग्रेस नेते नाराज होते. ते नाराज आता भाजपच्या संपर्कात आहे. यासोबतच काही अपक्षही भाजपच्या सोबत असल्याने निवडणुकीपर्यंत भाजप अध्यक्षपदासाठी एक सक्षम पर्याय देण्याच्या तयारी असल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'


Nagpur News : स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटीत घोटाळा, शिवशाहीत प्रवाशांना चक्क शून्य पैशांचे तिकीट