Nagpur Shirdi ST Bus : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यावर एसटी महामंडळाने सुरु केलेल्या नागपूर ते शिर्डी या 'नॉनस्टॉप' बस सेवेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सात लाख 32 हजार 960 रुपयांचे उत्पन्न या बससेवेतून महामंडळाला झाले आहे.


17 डिसेंबरपासून एसटी महामंडळाच्या नागपूर ते शिर्डी बससेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून तर काल म्हणजेच आठ जानेवारीपर्यंत एकूण 730 प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला. ही विशेष बस नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक (Ganeshpeth Bus Stand Nagpur) येथून दररोज रात्री नऊ वाजता निघत असून पहाटे साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचते. तसेच शिर्डी (Shirdi) येथूनही बस रात्री नऊ वाजता निघून पहाटे साडेपाच वाजता नागपुरात (Nagpur) दाखल होते. या बससेवेसाठी प्रति व्यक्ति 1300 रुपयांचे तिकीटदर ठरविण्यात आले असून लहान मुलांसाठी 670 इतके प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलतही या बसमध्ये लागू आहे. शिवाय 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के सवलतही लागू  आहे.


प्रवाशी संख्येत लक्षणीय वाढ...


यामध्ये 75 वर्षांवरील 77 ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभ मिळाला असून त्यांना तिकीट दरात शंभर टक्के सवलत देण्यात आली. तसेच 65 ते 75 वर्ष वयोगटातील 37 ज्येष्ठ नागरिकांनी तिकीटदरात पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेतला. यासोबतच 94 प्रवाशांनी 'आवडेल तेथे प्रवास' या सवलतीचा लाभ घेतला. यामध्ये आतापर्यंत सात लहान मुलांनाही सवलत मिळाली तर एकूण प्रवाशांपैकी 545 प्रोढ प्रवाशांचा यात समावेश होता.


गरज पडल्यास आणखी बस फेऱ्या वाढवणार


सध्य दररोज फक्त एक बस नागपूर ते शिर्डीसाठी नियोजित करण्यात आली आहे. तसेच भविष्यात भाविकांची मागणी असल्यास विकेंडमध्ये बसेसची संख्या वाढविण्याचाही विचार करण्यात येईल. या नव्या एसटीची विनावातानुकूलित (Air Conditioner) बसमुळे नागरिकांना थेट शिर्डी पोहोचता येत आहे. विकेंडला या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस प्रवासीसंख्येत वाढ होत असल्याची माहिती एसटीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सांगितले.


ही बातमी देखील वाचा...


विवाहित महिलेशी अश्लिल चॅटिंग ; नामांकित कंपनीच्या सुपरवायझरची पोलिसांसमोरच 'धुलाई'