Nagpur News Update : निवृत्तीनंतर ज्यांना पेन्शन नाही असा 95 टक्के नोकरदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अनिश्चिततेचे सावट आहे. म्हणून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी मनी बी तर्फे मागील सात वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या 'अमृतकाळ गुंतवणूक साक्षरता' उपक्रमामुळे तरुणांना फायदा होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने साक्षरता वाढवण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. 


मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे दोन दिवसीय  'अमृतकाळ गुंतवणूक साक्षरता' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, 'युवा पिढीमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अतिशय आवश्यक आहे. अनेकांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता मिळाल्याने व्यवसाय नोकरीत फायदा झाल्याचे मी ऐकले आहे. आर्थिक साक्षरता गुंतवणूक साक्षरता या संदर्भात नॅशनल स्टॉक एक्स्जेंच, मनी बी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. भारत सध्या जगातली पाचवी मोठी आर्थिक सत्ता आहे. त्यासाठी जागरूकता आवश्यक आहे.'


मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने साक्षरता वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका शिवानी दाणी- वखरे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे श्रीराम व्यंकटेश, आशुतोष वखरे, मार्केट एक्स्पर्ट एस.पी. तुलसियन, केडीया सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक विजय केडीया, वेंचूर कॅटलिस्ट ग्रुपचे सहसंस्थापक डॉ. अपूर्वा शर्मा उपस्थित होते.  दोन दिवसीय उपक्रमात आठ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.


सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी 


वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले, 'आर्थिक गुन्हे अनेक ठिकाणी होत असल्याचे दिसून येते, राज्याचे गृहमंत्री म्हणून याची मला कल्पना आहे. चिंतेची बाब म्हणजे गरीब वा सेवानिवृत्त लोकांची होणारी फसवणूक. त्यामुळे या साक्षरतेचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे आहे. डिजिटल पेमेंटमध्ये भारत सध्या जगाचे नेतृत्व करत आहे. सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र कठोर कायदे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


आर्थिक धोरणाची वाटचाल समृद्धीकडे: रिधम देसाई


केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे पुढील वर्षात देशाची अर्थ व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे असे प्रतिपादन मोरगन स्टॅनले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई यांनी केले. ते म्हणाले, 'येत्या काळात ऊर्जा, बँकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती, उत्पादन क्षेत्राला अच्छे दिन येणार आहे. त्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दरम्यान, बँकिंग क्रेडिट स्कोरबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी पीएमईएसचे सदस्य संजीव सन्याल यांनीही शेअर बाजारातील घडामोडींवर प्रकाश टाकला.'


ही बातमी देखील वाचा...


नागपूरकरांनी अनुभवली थंडगार रात्र; पहिल्यांदाच पारा 8 अंशांवर