Nagpur News :  नागपूर शहर झपाट्याने विस्तारते आहे. नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेतही सकारात्मक बदल केले जात आहेत. पण, या सर्व प्रयत्नांनंतरही खासगी वाहनांची विक्री काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्याचवेळी ऑटो विक्रीचाही ग्राफ वाढताच आहे. नुकत्याच संपलेल्या वर्षात नागपूर जिल्ह्यात 95,605 वाहनांची विक्री झाली. त्यात 15,500 प्रवासी कारचाही समावेश आहे. पूर्वी जिल्ह्यात 10 -12 हजार चारचाकी वाहनांची विक्री व्हायची. आता हा आकडा बराच वाढला आहे. नागपूर शहरात 3 प्रादेशिक परिवहन (Regional Transport Office Nagpur) कार्यालये आहेत. नवीन वाहनांच्या नोंदणीचा विचार केल्यास ग्रामीण कार्यालय आघाडीवर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार शहर कार्यालयात जनेवारी ते डिसेंबर दरम्यान 16,782 वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले. पूर्व नागपूर कार्यालया ही संख्या 37,992 राहिली, तर ग्रामीण कार्यालयाने आघाडी घेत 40,831 वाहनांचे रजिस्ट्रेशन केले. या नोंदीनुसार जिल्ह्यातील रस्त्यावर रोज 42 नव्या चारचाकी वाहनांची भर पडली. 


दर दिवशी 261 वाहनांची विक्री 


आरटीओ कार्यालयातील नोंदीनुसार नागपुरात दरदिवशी सरासरी 261 वाहनांची विक्री होते. त्यात 42 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यामुळे रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांची गर्दी सातत्याने वाढत असल्याचे दिसते. प्रत्येक चौकांत सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. अनेक मार्गांवर सतत वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आहे. 


नोंदणीत ग्रामीण कार्यालय आघाडीवर 


रजिस्ट्रेशनच्या आकड्यांवर लक्ष टाकल्यास ग्रामीण आरटीओ कार्यालय आघाडीवर असल्याचे दिसते. दर महिन्यात सरासरी 3,402 वाहनांचे रजिस्ट्रेशन होत आहे. त्याचवेळी पूर्व नागपूर कार्यालयात सरासरी 3,166 वाहन आणि शहर कार्यालयात सरासरी 1,398 वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. 


ऑटोला मोठी मागमी 


रोजगारासाठी अनेकांचा कल ऑटो चालविण्याकडे असल्याचे दिसते. विशेषतः पूर्व नागपूर कार्यालयात दरमहा सरासरी 200 ऑटोरिक्शांचे रजिस्ट्रेशन केले जात आहे. ग्रामीण आरटीओत मात्र ऑटोंच्या रजिस्ट्रेशनचे प्रमाण कमी आहे. शहर आरटीओत दरमाह 15-20 ऑटोंची नोंदणी होते आहे. डिलीवरी व्हॅनलासुद्धा मोठी मागणी आहे. पूर्व आरटीओ कार्यालयात दरमहिन्यात 150 ते 200 तीनचाकी व चारचाकी डिलीवरी व्हॅनचे रजिस्ट्रेशन होते आहे. शहर कार्यालयात 30-40 वानहांची तर ग्रामीण कार्यालयात 70 ते 80 वाहनांचे रजिस्ट्रेशन होते आहे. 


रोज 208 दुचाकी वाहनांची भर 


नागपूर जिल्ह्यात रोज सरासरी 208, दरमहा 6250 ते 6300 तर वर्षभरात 75,000 दुचाकी वाहनांची विक्री होते आहे. त्यातही मोटारसायकलला सर्वाधिक मागणी आहे. किमती वाढल्याने वाहनांच्या विक्रीत घट दिसत आहे. पण, हे प्रमाण फारच नगण्य आहे. 


वर्षभरातील वाहनांची विक्री 



  • 95,605 वाहनांची एकूम विक्री

  • 15,500 कार विकल्या गेल्या

  • 75,000 दुचाकी वाहनांची विक्री 


आरटीओ कार्यालय निहाय रजिस्ट्रेशन


       कार्यालय - नोंदणी



  • शहर (MH31) - 16,782

  • पूर्व (MH49) - 37,992

  • ग्रामीण (MH40) - 40,831


ही बातमी देखील वाचा...


जिल्हा सत्र न्यायालयात वकील आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची धक्काबुक्की : परस्परांविरोधात तक्रार दाखल