Teachers Constituency Elections Nagpur : आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात कॉंग्रेसने काल (11 जानेवारी) सायंकाळी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच नागपूर विभागात आपला उमेदवार राहणार नसून आपण शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सतीश इटकेलवार यांनी गुरुवारी (12 जानेवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे अनिश्‍चिततेचा खेळ होऊन बसली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण किंवा पाठिंबा कुणाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असताना सतीश इटकेलवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रणधुमाळीत धूम उडवून दिली आहे. "या निवडणुकीची तयारी आजची नाही, तर गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे," अशी प्रतिक्रिया इटकेलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


16 जानेवारीपर्यंत गोंधळ


भाजप समर्थीत शिक्षक परिषद असो, शिक्षक भारती वा शिक्षक सेना या संघटनांच्या पाठबळावर आणि वैयक्तिक संबंधांच्या भरवशावर ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वास आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश ईटकेलवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत चाललंय तरी काय, या प्रश्‍नाचे उत्तर आता 16 जानेवारीला अर्ज परत घेण्याच्या दिवशी माहिती होणार आहे. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिल्यानंतरही राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली, हा संदेश सर्वत्र गेला आहे. 


महाविकास आघाडीचे चार उमेदवार


महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या गटांचे चार उमेदवार आता रिंगणात आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, उद्धव ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करुन त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. आता पक्षाने काय ते ठरवायचे आहे आणि त्यासाठी 16 जानेवारीपर्यंत वेळ आहे. पक्षाने योग्य निर्णय घ्यावा. कारण आता आपली माघार नाही, लढणार म्हणजे लढणारच, असा निर्धार इटकेलवार यांनी जाहीर केला आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.


ही बातमी देखील वाचा...


दुसऱ्याकडून फॉर्म भरुन घेणे महागात; बँकेच्या कर्मचाऱ्यानेच 20 ग्राहकांना 59 लाखांनी गंडवले