Nagpur News : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अखेर सुटणार असून यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरटीच्या (Maharashtra Airport Development Company Limited) माध्यमातून 38.73 कोटीचा निधी मंजूर केला आहे. एमएडीसीने याबाबतचे पत्र मिहानच्या मुख्य अभियंत्यांना पाठिवले असून या कामाच्या निविदा विनाविलंब करण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत. यामुळे प्रलंबित मिहान पुनर्वसनाच्या समस्या मार्गी लागणार आहेत.


अनेक वेळा प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री आदींची भेट घेऊन मिहानकरिता खापरी, कलकोही, तेल्हारा या गावांच्या जमिनी संपादित केल्या आणि गावांचे पुनर्वसनही झाल्याचा मुद्दा मांडला होता. पुनर्वसन संबंधित प्रलंबित समस्यांवर अनेक वर्षांपासून तोडगा काढण्यात आला नसल्याचेही सांगितले होते. त्यावेळी या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले होते, मात्र अनेक वर्षांपासून आश्वासनांपलिकडे प्रकल्पग्रस्तांना काहीच मिळाले नव्हते. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. शिवाय या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पुढाकार घेतला होता. यावर तातडीने कार्यवाही करीत राज्य सरकारने एमएडीसीच्या माध्यमातून  38.73 कोटीचा निधी जारी केला आहे. या कामाच्या निविदा तातडीने विनाविलंब काढव्या असेही सूचिवले आहे. 


ही कामे लागणार मार्गी



  •  पुनर्वसित गावातील आंतरिक रस्ते.

  •  पावसाचे व गावातील पाण्याच्या विसर्गासाठी ड्रेनेज.

  •  विजेच्या वाहिन्यांचे विद्युतीकरण.

  •  पाणीपुरवठा योजना.

  •  मलनिस्सारण योजना. 

  • शिंदे-फडणवीस यांच्यासह गडकरींचेही आभार.


पुनर्वसित गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना एमएडीसीने निधी जारी केल्याने या गावांचा विकास होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आणि सरकारचे आभार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले आहे. सोबतच खापरीसह इतर पुनर्वसित गावांतील लोकप्रतिनिधी, खापरीचे सरपंच रेखा सोनटक्के, प्रतिभा रोकडे, गणेश बारई, शेखर उपरे, विनोद ठाकरे, सचिन म्हस्के, शालिनी भुसे, चंद्रकला चरडे, केशवराव सोनटक्के व रुपराव शिंगणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.


इतर महत्त्वाची बातम्या


MCA Election 2022 : पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, संदीप पाटील पराभूत