नागपूर : येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांचा फटका नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठालाबसण्याची शक्यता आहे. कारण विद्यापीठाच्या येस बँकेमध्ये 191 कोटींच्या ठेवी असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय उपलब्ध असताना खासगी बँकेत इतक्या ठेवी ठेवल्यामुळे अनेक प्रश्न ही उपस्थित केले जात आहे.


रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर विद्यापीठाच्या सिनेटची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सिनेट सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी हा मुद्दा उचलला. राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यापीठाने पैसा का ठेवला नाही, येस बँकेत ठेवी ठेवणे हे नियमांच्या विरोधात नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान सध्या तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या किती ठेवी येस बँकेत आहे, आणि ते कोणाच्या निर्देशाने तिथे ठेवलल्या हे स्पष्ट केलेलं नाही.


राज्य सरकारच्या नियमानुसार विद्यापीठाचे पैस राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र नियम डावलून हे पैसे येस बँकेत का ठेवले गेले, याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या चौकशीनंतर दोषींवर कारवाईची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती मनमोहन वाजपेयी यांनी दिली.


YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन



नाशिक, पिंपरी-चिंचवड महापालिकांनाही फटका


पिंपरी चिंचवड पालिकेने येस बँकेत 800 कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. मात्र येस बँकेवर निर्बंध आल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचं बोललं जातं आहे. मात्र महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बँकेत नाशिक महापालिकेचे 310 कोटी रुपये तर स्मार्ट सिटी कंपनीचे 15 कोटी रुपये अडकल्याची माहिती समोर येत आहे.


Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही


काय आहे प्रकरण?


रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार आहेत. या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. येस बँकेच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचे शेअर्स 74 टक्क्यांनी खाली आले. आर्थिक संकटाचा सामना करीत येस बँकेच्या समभागात होणारी पडझड पाहून गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.


पुढील एका महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. येस बँक कोणतेही नवीन कर्ज वितरित करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास सक्षम राहणार नाही. त्याचबरोबर देशाच्या सर्वात मोठ्या बँक एसबीआयच्या संचालक मंडळाने रोकडसंगतीचा सामना करीत येस बँकेत गुंतवणूक करण्यास 'तत्वत: मान्यता' दिली आहे. दरम्यान, आयुष्यभराची जमापुंजी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात बँकेत ठेवली होती. मात्र, आता आपले पैसे परत मिळणार की नाही या चिंतेपोटी खातेदारांची झोप उडाली.