Ricky Kej On Grammy Awards 2023 : भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांचं ग्रॅमी पुरस्कारासोबत (Grammy Awards) खास नातं आहे. संगीतप्रेमींसाठी मानाचा असणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards 2023) नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम (Best Innersive Audio) या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे. रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहर उमटवल्याने भारतीय संगीतप्रेमी आनंदी झाले आहेत.
ग्रॅमी पुरस्कार पटकावल्यानंतर रिकी केज म्हणाला...
ग्रॅमी पुरस्कार पटकावल्यानंतर रिकी केज यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रिकी केज यांनी ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"कृतज्ञता व्यक्त करतो. माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार". रिकी यांच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नामांकन जाहीर झाल्यानंतर रिकी केज म्हणाला होता,"तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा खूप आनंद आहे. 'डिव्हाईन टाइड्स' हा आतापर्यंतचा माझा यशस्वी अल्बम आहे. दिवसेंदिवस या अल्बला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या अल्बमसाठी मिळणारं यश पाहून मी भारावून गेलो आहे".
रिकी केज कोण आहे?
रिकी केज हे भारतातील एक लोकप्रिय संगीतकार आहे. त्यांनी जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांमधील 100 पुरस्कांरांपेक्षा अधिक पुरस्कार जिंकले आहेत. भारताचा युवा आयकॉन म्हणूनदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रिकी यांनी आता ग्रॅमी पुरस्काराच्या माध्यमातून देशाचे नाव जगात रोशन केले आहे.
ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे यंदाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात महिलांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी यंदाचा पुरस्कार सोहळा खूपच खास आहे.
संबंधित बातम्या