कल्याण : कल्याणमध्ये सध्या चर्चा आहे ती एक व्हायरल व्हिडीओची.  एक तरुण या व्हिडीओमध्ये विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडून आल्याचा दावा करत आहे. हा व्हिडीओ एक स्टिंग असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ खरा आहे का याबाबत देखील प्रश्न चिन्ह आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची 40 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 


मे महिन्यातील हा व्हिडीओ असून याबाबत आमदार गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडीओत दावा करणाऱ्या आशिष चौधरी आपल्या मुलाची 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असून या व्हिडीओची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.


कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची त्यांच्याच सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संबंधित तरुणाला अटकही करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गणपत गायकवाड यांच्याशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण उभं राहिलं आहे. ते म्हणजे एका व्हायरल व्हिडीओचं.  हा  व्हिडीओ हे स्टिंग केल्याचा दावा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे आमदारांच्या मुलाची फसवणूक करणाऱ्या तरुणाचं हे स्टिंग असून आमदार ईव्हीएम हॅक करुन मतदानात निवडून आल्याचा दावा या व्हिडीओत सदर तरुण करताना दिसतोय.


हा  व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओमध्ये कितपत सत्यता आहे हे तपासांती स्पष्ट होणार आहे. व्हिडीओ  व्हायरल झाल्यावर भाजप आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या व्हिडीओतला इसम हा पोलीस कोठडीत  असून त्याने चुकीची माहिती दिल्याचा दावा गणपत गायकवाड यांनी केला. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन ठोस कारवाईची मागणी केली आहे. तर याबाबत आशीष चौधरी आणि व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सध्या कोळशेवाडी पोलिसांचा तपास सुरु आहे.