Yogi Adityanath In Mumbai:  उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विविध उद्योजकांच्या भेटी घेतल्या. दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ हे पाच लाख कोटींची गुंतवणूक (Investment) राज्यात घेऊन गेले आहेत. उत्तर प्रदेशात रिलायन्स (Reliance), अदानी (Adani), टाटा (Tata), पिरामल (Piramal) इतर उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तर प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे आमंत्रण योगी आदित्यनाथ यांनी दिले असून त्या ठिकाणी काही करार होण्याची शक्यता आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांच्यासह इतर उद्योजक आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनीदेखील योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली. 


रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशात 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने उत्तर प्रदेशातील गावांमध्ये उत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. अदानी समूह सार्वजनिक-खासगी मॉडेलवर वैद्यकीय कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, नोएडामध्ये 10 हजार युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. 


रिलायन्स, टाटा सन्स, अदानी, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आणि रामकी यांच्यासह दोन डझनहून अधिक उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात त्यांची भेट घेतली. मॅरेथॉन बैठकांदरम्यान उद्योगधंद्यांसोबतच्या विशेष बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या व्हिजनमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.


अदानी समूह करणार गुंतवणूक


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, अदानी समूहाचे करण अदानी यांनी वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीच्या कृती आराखड्यावर चर्चा केली. पुढील पाच वर्षांत लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या अनेक प्रस्तावांसह 07 वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट कारखाने सुरू करण्याबाबत चर्चा केली. करण अदानी यांनी बलिया आणि श्रावस्तीमध्ये पीपीपी पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. याशिवाय अदानी समूह सायलो, स्मार्ट मीटर निर्मितीमध्येही गुंतवणूक करणार आहे.


बिर्ला समूह उभारणार कन्व्हेन्शन सेंटर


आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी नोएडा येथे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी सरकारचे सहकार्य मागितले आणि हे कन्व्हेन्शन सेंटर जगातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक असेल असे सांगितले. अन्न प्रक्रिया, डेटा सेंटर्स, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. 


टाटा समूहाने काय आश्वासन दिले?


टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर चर्चा केली. तसेच आध्यात्मिक सर्किटच्या विकास आराखड्यावर चर्चा केली. ते म्हणाले की, एअर इंडियाची विमानसेवा लवकरच उत्तर प्रदेशातील सर्व विमानतळांवर उपलब्ध होईल, तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या सर्व ठिकाणी हॉटेल्स उभारण्यात येतील. टाटा ऊर्जा, हायड्रोजन, ईव्ही, अन्न प्रक्रिया आणि सेमीकंडक्टरमध्ये मोठ्या गुंतवणूक योजनांवर काम करत असून उत्तर प्रदेशसोबत काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 


पिरामल समूहाची वाराणीस विशेष मोहीम 


पिरामल एंटरप्रायझेसचे अजय पिरामल म्हणाले की, कंपनी आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. टीबीमुक्त भारताच्या पंतप्रधानांच्या संकल्पात सामील होऊन आम्ही वाराणसीमध्ये विशेष मोहीम सुरू करणार आहोत. फार्मा पार्कच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा व्यक्त केली.


JSW ग्रुपचे MD सज्जन जिंदाल यांनी सोनभद्र येथे वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक पंप्ड स्टोरेज प्लांट उभारणे, कानपूर येथे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटची स्थापना आणि नवीन पेंट युनिट उभारण्याबाबत चर्चा केली. कानपूरमधील मंदिर आणि नैमिषधामच्या विकासात सहभागी होण्याची इच्छाही जिंदाल यांनी व्यक्त केली.


हिरानंदानी समूहाचे प्रमुख दर्शन हिरानंदानी यांनी नवीन प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करताना, परदेशी भागीदारांच्या मदतीने सेमीकंडक्टर गुंतवणुकीच्या योजनांवर चर्चा केली. 


16 जिल्ह्यांमध्ये गॅस आणि लोअर वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवरच्या जिनल मेहता यांनी सांगितले की, कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पात 5000 नोकऱ्या निर्माण झाल्या असून 90 टक्के स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काम करतानाचे त्यांचे अनुभव उत्साहवर्धक असल्याचे सांगून त्यांनी म्हटले की, आम्ही नवीन गुंतवणुकीसह राज्याच्या विकासात सहभागी होऊ. 


वेदांता समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल म्हणाले की, आम्ही नोएडामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही क्षेत्रातील एक मोठे संशोधन आणि विकास प्रकल्प आणण्यास तयार आहोत. सुमारे 500 भारतीय आणि परदेशी लोकांना येथे नोकऱ्या मिळणार आहेत. याशिवाय, मोबाईल आणि टॅब्लेटवर वापरल्या जाणार्‍या काचेच्या निर्मितीसाठी गोरखपूरमध्ये काच उत्पादन युनिट स्थापन करण्याची योजना आहे. यासाठी अनेक कंपन्यांसोबत काम करून इको-सिस्टम विकसित केली जाईल असे त्यांनी म्हटले. 


हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​संजीव मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की त्यांच्या कंपनीचे एटा, ओराई, हमीरपूर इत्यादी ठिकाणी पाच युनिट्स कार्यरत आहेत. त्याच्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, HUL पुढील दोन वर्षांत मोठी गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी म्हटले.